इंटरसिटी रद्द, मुंबईला जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:36+5:302021-06-16T04:13:36+5:30
प्रवासी वेटिंगवर : इंटरसिटी गाड्या सुरू करणे गरजेचे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या पाच इंटरसिटी गाड्या अजूनही ...

इंटरसिटी रद्द, मुंबईला जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना
प्रवासी वेटिंगवर : इंटरसिटी गाड्या सुरू करणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या पाच इंटरसिटी गाड्या अजूनही रद्दच आहे. तर दुसरीकडे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना वेटिंग आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही गाड्यांमध्ये केवळ तत्काळ कोटातून तिकीट उपलब्ध आहे. मात्र, यातून तिकीट काढणे प्रवाशांना महागात पडत आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान बंद असलेल्या इंटरसिटी गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रशासनाने डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस आदी प्रमुख गाड्या रद्द केल्या. आता अनलॉकमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. गाड्या कमी, प्रवासी जास्त अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सर्वश्रेणीच्या तिकिटासाठी वेटिंग सुरू आहे. यात नागरकोईल-मुंबई, हैदराबाद-मुंबई विशेष, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस, व उद्यान एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.
बॉक्स १
उद्यान एक्स्प्रेसला रिग्रेट, वेटिंग तिकीट पण नाही...
बंगळुरू-मुंबईदरम्यान धावणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने २० जूनपर्यंत या गाडीला रिग्रेट केले आहे. म्हणजे वेटिंगचा देखील कोटा संपल्याने प्रशासनाने वेटिंग तिकीटही बंद केले आहे. २१ तारखेपासून वेटिंग सुरू आहे. यानंतर हुसैनसागर एक्स्प्रेसला शयनयान द्वितीय श्रेणी दर्जाच्या तिकिटासाठी ७५ वेटिंग आहे.
बॉक्स २
एसी डब्यांना गर्दी : गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने प्रवासी जे आरक्षित तिकीट उपलब्ध आहे, ते काढत आहेत. परिणामी ३ एसी व २ एसीचे जनरल कोट्यातील तिकीट बुक आहेत. काही गाड्यांना केवळ तत्काळ कोट्यातील तिकीट उपलब्ध आहे. मात्र, तिकीट दर खूप आहे.
बॉक्स ३
एसी स्पेशल गाड्यांकडे पाठ
दुरांतो, हमसफर, शताब्दी आदी महत्त्वाचा गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, याचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली आहे. यात पुणे-निजामुद्दीन दुरांतो, पुणे-हावडा एसी स्पेशल आदी गाड्यांचा समावेश आहे.
बॉक्स
पॅसेंजर सुरू नाहीच
पुण्यासह संपूर्ण देशात पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पॅसेंजर गाड्यांतून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन देशात हळूहळू पॅसेंजर गाड्या बंद करणार आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या कधी सुरू करायच्या याबाबत रेल्वे बोर्डने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.