उसात बटाट्याचे आंतरपीक
By Admin | Updated: February 23, 2017 02:08 IST2017-02-23T02:08:36+5:302017-02-23T02:08:36+5:30
बरदस्त इच्छाशक्ती व नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर या जगात काहीच अशक्य

उसात बटाट्याचे आंतरपीक
गोरख माझिरे / भूगाव
बरदस्त इच्छाशक्ती व नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर या जगात काहीच अशक्य नाही. असेच काहीसे मुळशी तालुक्यात घडले. शेतीमध्ये अनेक प्रयोग यशस्वी करून दिलीप दगडे यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील मुळा नदीच्या तीरावर असलेल्या शेरे आणि अकोले या दोन गावांच्या सीमावर्ती भागात दिलीप दगडे यांची संयुक्त पद्धतीची शेती आहे. यामध्ये काही क्षेत्रात ऊस, ४ एकर क्षेत्रात आमराई, ४ एकर क्षेत्रात भातलागवड व भातकाढणी झाल्यानंतर तरकारी केली जाते.
एकत्र कुटुंब पद्धतीने नांदणाऱ्या या घरामध्ये दिलीप यांच्यासह चार बंधू व त्यांचे चुलत बंधूही राहतात. दिलीप यांनी आपल्या शेतावर मजुरांना कुटुंबासमवेत राहण्याची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांना मजुरांची कमतरता कधीच भासली नाही.
दिलीप यांच्या गोठ्यामध्ये सुमारे १२ देशी गाई, २ वळु, ४ खिलार गाई, ४ वासरे, २ बैल आहेत. घरच्या कालवडी विकल्या जात नाहीत. गाईपासून सुमारे २५ लिटर दूध मिळते. दूध घरी कामगारांना खाण्यापुरते व वासरांसाठी काढून उरलेल्या सर्व दुधाचे तूप काढले जाते. दररोज साधारण एक किलो तूप मिळते. तूप देशी गाईचे असल्याने तुपाला १८०० रुपये भाव मिळतो. मुक्त गोठ्याामुळे जनावरांच्या खालचे शेण न काढता त्यातून मिळालेले ताक या शेणात टाकले जाते. हे शेण ३ महिने काढत नाही, त्यामुळे नैसर्गिकपणे खत निर्मिती होऊन त्रासही वाचतो. गोमूत्रापासून जीवामृत तयार केले जाते. गांडूळ खत आणि जीवामृताच्या वापरामुळे शेतातील रासायनिक खतांच्या वापरावर नियंत्रण आले आहे.
चार एकर क्षेत्रात पावसाळ्यात भातलागवड करतात. भातकाढणी झाल्यानंतर, तरकारी केली जाते. यामध्ये बटाटा, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो हे पीक घेतात. याला दोन वर्ष संपूर्णपणे सेंद्रिय खते दिली आहेत, यामुळे उत्पन्नात निश्चितपणे भरघोस वाढ झाली आहे.
दिलीप यांच्याकडील एकरी ऊस उत्पादन ३०-३५ टनांच्या आसपासच होते. आता ते पाचट जागेवरच कुजवून त्याची खतनिर्मिती करून त्याचा वापर करता. लागवडीच्या उसाची तोडणी झाल्यानंतर यंदा त्यांनी पाचट न जाळण्याचा प्रयोग केला आहे. यंत्राद्वारे त्याची बारीक कुट्टी केली. युरिया, सुपर फॉस्फेट आदी खते टाकून ते कुजवण्याची प्रक्रिया केली. आज हा ऊस शेतात उभा आहे. या प्रयोगामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळणार असल्याचे दगडे म्हणाले. मागील वर्षी सुमारे अडीच एकर पाचट कुजवलेल्या क्षेत्रात त्यांनी एकरी ६० टनांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे.