ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST2021-09-16T04:15:03+5:302021-09-16T04:15:03+5:30
इंदापूर: राज्यातील सात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्वीच झाल्या आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीला ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या निवडणुकांमधील ओबीसी ...

ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर तीव्र आंदोलन
इंदापूर: राज्यातील सात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्वीच झाल्या आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीला ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षित असणाऱ्या उमेदवारांच्या सदस्यत्वाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
भाजपच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. इंदापूर येथे बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस, ॲड. धर्मेंद्र खांडरे, तानाजी थोरात, मारुती वणवे, भटक्या विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे, माऊली चवरे, तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकिल सय्यद, पांडुरंग शिंदे, गटनेते कैलास कदम, गोरख शिंदे, प्रेमकुमार जगताप उपस्थित होते. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने नामांकित वकील दिले नाहीत, तसेच राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी वकील उभा राहू शकला नाही खेदजनक बाब आहे. तसेच आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत सर्व पक्षीय नेत्यांच्या दोन बैठका झाल्या, विरोधी पक्ष सोबत होता म्हणजे यांना निर्णय घेण्यास अडचण नसायलाच पाहिजे. मात्र जाणीवपूर्वक आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाला बाजूला ठेवत आहे. पाच जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्या पाच जिल्ह्यातील निवडणुका देखील आता जाहीर झाल्या असून त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलाव्यात, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.
१५ इंदापूर
इंदापूर येथे ओबीसी आरक्षण देण्याबाबत भाजपचे सुरु असलेले आंदोलन.