पोस्ट कार्यालयात अपुरे मनुष्यबळ
By Admin | Updated: February 8, 2017 02:45 IST2017-02-08T02:45:28+5:302017-02-08T02:45:28+5:30
दैनंदिन कामासह विमा, बचत खाते, माती परीक्षणासह अन्य कामे पोस्ट कार्यालयांना देण्यात आली आहेत. मात्र, मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे

पोस्ट कार्यालयात अपुरे मनुष्यबळ
बारामती : दैनंदिन कामासह विमा, बचत खाते, माती परीक्षणासह अन्य कामे पोस्ट कार्यालयांना देण्यात आली आहेत. मात्र, मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. कमी कर्मचाऱ्यांच्या बळावरच पोस्ट कार्यालयांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत. त्यातच आता पासपोर्ट काढण्याचे कामदेखील पोस्टामार्फत होणार आहे. त्यामुळे बारामतीच्या पोस्ट कार्यालयाला प्रधान पोस्ट कार्यालयाचा दर्जा प्राप्त होण्याची प्रतीक्षाच आहे. प्रधान पोस्ट कार्यालयाचा दर्जा मिळाल्यास मनुष्यबळाची कमतरता जाणवणार नाही. त्याचबरोबरनागरिकांना देखील दैनंदिन महत्त्वाच्या कामासाठी पुण्याला जाण्याचे हेलपाटे वाचणार आहेत.
सध्या ४ सहायक पोस्ट कर्मचारी आणि ८ पोस्टमन या कार्यालयात कार्यरत आहेत. त्याचबरोबर मल्टीटास्क सर्व्हिसची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून घेण्यात आले आहे. उर्वरित कामे ग्रामीण डाक सेवकांच्या मार्फत करून घेतली जातात. बारामती पोस्ट कार्यालयासह उपविभागीय पोस्ट कार्यालयदेखील कार्यरत आहे. दोन्ही कार्यालये एकाच इमारतीत कार्यरत आहेत. दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच आहे. दैनंदिन कामाचा बोजा वाढलेला आहे. सहायक उपअधीक्षक पोस्ट कार्यालयाचे कार्यक्षेत्र बारामती, दौंड, इंदापूरमधील सर्व कार्यालयांच्या संबंधित येते. दैनंदिन बचत खाती काढणे, किसान विकास पत्रासह अन्य बचत खात्यांची कामे या कार्यालयाच्या मार्फत केली जातात. त्याचबरोबर अलिकडच्या काळात बचतखात्यांबरोबरच विमा पॉलिसीची कामेदेखील याच कार्यालयांना करावी लागत आहेत. त्या दृष्टीने उद्दिष्टपूर्तीसाठी देखील नियोजन केलेले असते. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे. (प्रतिनिधी)
सुविधा वाढणार : प्रधान पोस्ट कार्यालयाचा दर्जा प्रतीक्षेत...
बारामती पोस्ट कार्यालयाला मुख्य पोस्ट कार्यालयाचा (प्रधान पोस्ट कार्यालय) दर्जा देण्याच्या सर्व पूर्तता करण्यात आली आहे. त्याला तत्त्वत: मान्यतादेखील मिळाली आहे. मात्र, हा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा अद्याप आहे. प्रधान पोस्ट कार्यालयाचा दर्जा मिळाल्यास ग्राहकांच्या सुविधा वाढणार आहेत. बचत खात्यांची पूर्ती एका दिवसात करणे शक्य होणार आहे. सध्या विमा, बचत खात्यांची मुदत पूर्ण झाल्यावर पुण्याच्या प्रधान कार्यालयात पुढील सोपस्कार पार करावी लागतात. त्याला वेळ लागतो. बारामतीला मुख्य कार्यालयाचा दर्जा मिळाल्यास सर्व कामे याच ठिकाणी पूर्ण होतील. त्याचबरोबर जवळपास दुप्पट मनुष्यबळ मिळेल. लेखापाल, उपलेखापाल कार्यालय देखील याच अंतर्गत येतील. त्यामुळे या मुख्य कार्यालयाचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरव्याची गरज आहे. मध्यंतरी खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्य कार्यालयाच्या दर्जाला तत्त्वत: मान्यता मिळाली. मात्र, सध्या तरी हा दर्जावाढीचा प्रस्ताव थांबलेला आहे. नव्याने भरती झालेल्यांना
सेवेतून काढले...
मध्यंतरी देशपातळीवर सर्व पोस्ट कार्यालयांसाठी एकत्रित भरती करण्यात आली होती. त्यामुळे बारामतीच्या पोस्ट कार्यालयाला पाच नवीन कर्मचाऱ्यांचे बळ मिळाले होते. मात्र, या भरतीबाबत तक्रारी झाल्यानंतर पाच महिन्यांनी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्यात आली. त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे वाढलेले मनुष्यबळ कमी झाले. ... तर पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध होईल
प्रधान कार्यालय झाल्यावर या कार्यालयामार्फत नागरिकांना पासपोर्ट काढण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्राच्या नव्या धोरणानुसार पोस्ट कार्यालयात पासपोर्ट मिळण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या प्रधान कार्यालयांमध्येच ही सेवा सुरू होणार आहे. बारामतीचा दर्जा वाढल्यास बारामतीच्या नागरिकांना देखील पासपोर्टसाठी पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही.