शिरवली केंद्राची इमारत पडून
By Admin | Updated: July 6, 2015 04:32 IST2015-07-06T04:32:14+5:302015-07-06T04:32:14+5:30
वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारत पाणी तसेच वीजजोड नसल्याने आरोग्य विभागाने इमारत ताब्यात घेतलेली नाही.

शिरवली केंद्राची इमारत पडून
भोर : तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील आदिवासी नागरिकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने शिरवली हि.मा. (ता. भोर) येथे वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारत पाणी तसेच वीजजोड नसल्याने आरोग्य विभागाने इमारत ताब्यात घेतलेली नाही. डॉक्टरांचीही नेमणूक अद्याप न झाल्याने ही इमारत नुसती नावालाच उरली आहे. यामुळे मात्र रुग्णांची गैरसोय होत आहे. आरोग्यसेवेसाठी त्यांना खासगी दवाखान्यात जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
भोर शहरापासून ४० किलोमीटरवर नीरा देवघर धरणाच्या काठ रस्त्यावर (रिंगरोड) असलेल्या शिरवली हि.मा. येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली. या
रुग्णालयामुळे माझेरी, निवंगण, गुढे, शिरवली हि.मा., कुडली बुद्रुक, कुडली खुर्द, दुर्गाडी, अभेपुरी, मानटवस्ती या गावांतील लोकांना आरोग्यसेवा मोफत मिळणार आहे. तसेच त्यांचा भोरला येण्याचा हेलपाटा वाचणार आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. विविध साथींचे आजार या दिवसात पसरतात. अशा वेळी आजारी पडल्यास लोकांना खाजगी गाडीने किंवा एस.टी बसने निगुडघर किंवा भोरला यावे लागते. यामुळे या आरोग्य उपकेंद्राचा उपयोग काय, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित आरोग्य उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणी शिरवलीचे ग्रामस्थ व खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हनुमंत शिरवले यांनी केली आहे. (वार्ताहर)