सासवडमध्येच कचरा जिरवा
By Admin | Updated: October 26, 2015 01:54 IST2015-10-26T01:54:12+5:302015-10-26T01:54:12+5:30
कुंभारवळण येथील प्रस्तावित सासवड शहराच्या कचरा डेपोला कुंभारवळण व येथील एखतपुर-मुंजवडी, खळद, वनपुरी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी विरोध केला.

सासवडमध्येच कचरा जिरवा
सासवड : कुंभारवळण येथील प्रस्तावित सासवड शहराच्या कचरा डेपोला कुंभारवळण व येथील एखतपुर-मुंजवडी, खळद, वनपुरी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी विरोध केला. वेळ प्रसंगी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय रविवारी (दि. २५) कचरा डेपोच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी घेतला.
सासवड नगरपालिकेला हरित लवाद न्यायालयाने कचरा डेपो संदर्भात निर्देश दिल्यानुसार या पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शासनाच्या वतीने नायब तहसीलदार सुनंदा भोसले-पाटील, माजी आमदार चंदुकाका जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड आदींसह नगरसेवक या परिसरातील सात गावांतील आजी-माजी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सन २००९ पासून झालेल्या कचरा डेपोच्या विविध टप्यांची मुख्याधिकारी दुर्वास यांनी बैठकीच्या सुरुवातीस माहिती दिली. हा कचरा डेपो नसून जैव यांत्रिकी खतनिर्मिती प्रकल्प असून त्याचा या परिसरातील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही हे स्पष्ट केले. हरित लवाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नगरपालिकेस पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त असल्याचे दुर्वास यांनी सांगितले.
कचरा डेपोमुळे येथील शेती, पिण्याचे पाणी, पर्यावरण, वन्यजीव तसेच समाजजीवनावर परिणाम होईल. भविष्यात शेतीला कवडीमोल किंमत राहील व येथील गरीब शेतकरी वर्ग दुष्ट चक्रात अडकेल अशी धास्ती या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. सासवड नगरपालिकेने त्यांचा कचरा डेपो अन्य कोठेही उभारावा व येथील जनतेला न्याय द्यावा. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी या वेळी दिला. परिसरातील ग्रामपंचायतींच्या कचरा डेपोविरोधातील ठरावाच्या प्रती या वेळी मुख्याधिकारी दुर्वास यांना ग्रामस्थांनी दिल्या. प्रमोद कामठे, महादेव टिळेकर, अमोल कामठे, सचिन पठारे, संतोष हागवणे, रामदास होले, प्रशांत कुंभारकर, समीर कुंभारकर, रामभाऊ झुरंगे, मुरलीधर झुरंगे, उमेश कामठे, सुरेश रासकर, रूपाली टिळेकर, श्रीकांत ताम्हाणे, या आजी-माजी सरपंच व सदस्यांसह सुनील धिवार आणि पं. स. सदस्य दत्ता झुरंगे यांनी या वेळी आपल्या जळजळीत प्रतिक्रिया प्रशासनासमोर व्यक्त केल्या. सुनंदा पाटील यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी शासनदरबारी मांडून मार्ग काढला जाईल असे सांगितले. माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप यांनी पालिकेची भूमिका ग्रामस्थांसमोर स्पष्ट केली.