‘वायसीएम’ डॉक्टरांना चौकशीचे इंजेक्शन
By Admin | Updated: February 2, 2016 00:59 IST2016-02-02T00:59:42+5:302016-02-02T00:59:42+5:30
शासकीय वैद्यकीय सेवेत कार्यरत असताना पुण्यात अनधिकृतपणे खासगी रुग्णालय चालविणारे ‘वायसीएम’ रुग्णालयातील डॉ. संजय पाडाळे यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतंत्रपणे

‘वायसीएम’ डॉक्टरांना चौकशीचे इंजेक्शन
पिंपरी : शासकीय वैद्यकीय सेवेत कार्यरत असताना पुण्यात अनधिकृतपणे खासगी रुग्णालय चालविणारे ‘वायसीएम’ रुग्णालयातील डॉ. संजय पाडाळे यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतंत्रपणे चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला.
मंत्रालयात झालेल्या लोकशाही दिनात २२ तक्रारदारांच्या अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तक्रारदार अनुप कलापुरे यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून डॉ. पाडाळे कार्यरत आहेत.
बिबवेवाडी (पुणे) येथील जिजाऊ हौसिंग सोसायटीमध्ये डॉ. पाडाळे यांनी अनधिकृतपणे रुग्णालय सुरू केल्याबाबतची तक्रार कलापुरे यांनी लोकशाही दिनात मांडली होती. या संदर्भात कलापुरे यांनी संपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात सादर केले. मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान, या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी केलेली कार्यवाही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तक्रारदारांनी सादर केलेली कागदपत्रे, पुरावे आणि पिंपरी-चिंचवडच्या महापालिका आयुक्तांनी दिलेली माहिती यात सुसूत्रता दिसून येत नाही. ज्याने चूक केली असेल, त्या दोषींवर कारवाई करा. पाडाळे हे शासकीय सेवेत असतानाही खासगी रुग्णालय कसे काय चालवू शकतात, असा सवाल करून या संदर्भात पुणे महापालिका आयुक्तांनी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.(प्रतिनिधी)
डॉ. पाडाळे यांच्याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील त्यांच्या खासगी रुग्णालयाची तपासणी व चौकशी केली. यावरून पाडाळे हे खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करीत नसल्याचे समोर आले. दरम्यान, पाडाळे हे शासकीय सेवेत असून त्यांचे रुग्णालय पुण्यात आहे. त्यामुळे हे खासगी रुग्णालय सुरू ठेवता येते की नाही, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पुणे महापालिकेला आहे.
- राजीव जाधव
आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका