पवना धरणात धनाढ्यांचे अतिक्रमण
By Admin | Updated: June 18, 2015 23:50 IST2015-06-18T23:50:52+5:302015-06-18T23:50:52+5:30
पवना धरण जलाशयाच्या ५०० मीटर क्षेत्रात मुंबई येथील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. पाटबंधारे प्रशासनाला न जुमानता भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पवना धरणात धनाढ्यांचे अतिक्रमण
पवनानगर : पवना धरण जलाशयाच्या ५०० मीटर क्षेत्रात मुंबई येथील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. पाटबंधारे प्रशासनाला न जुमानता भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शासनाने पाणीसाठा करण्यासाठी धरण पात्रातील गाळ काढण्याची मोहीम गेली पाच वर्षे हाती घेतली आहे. धरण व पाणी साठवण क्षेत्रातील गाळ काढून जास्तीत जास्त पाणीसाठा करण्याचा शासन प्रयत्न करत आहे. मात्र, धरणाच्या जलाशयाच्या ठिंकाणी ठाकूरसाई गावानजीक संपादित क्षेत्रात काही ठिकाणी मुरूम व मातीचा मोठा भराव टाकण्याचे काम चालू आहे. यामुळे पाणी साठवण्याचे काही क्षेत्र कमी होणार आहे. मुंबई येथील अनेक धनाढ्यांनी जलाशयाच्या कडेच्या संपादित व बिगर संपादित जमिनी खरेदी करून मोठे बंगले उभारले आहेत. जलाशयाचे सहज दर्शन होईल अशा ठिकाणी हे बंगले उभारले आहेत किंवा बुडीत क्षेत्रातच अनेक ठिकाणी अतिक्र मण केले आहे. शिवाय, या बंगल्याचे सांडपाणीदेखील धरणाच्या पाण्यात सोडले आहे.
जलाशयाच्या कडेला अनेक अनधिकृत कामे केवळ पाटबंधारे विभागाची दिशाभूल करून किंवा तेथील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सुरू आहे. शासन पातळीवर याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे व अतिक्रमणे करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने आता धरणच बुजवण्याचे काम सुरू आहे. हे जर रोखले गेले नाही, तर धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होईल व पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवेल. धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळावे म्हणून पवना भागातील ३ शेतकऱ्यांना पाण्यासाठीच्या लढ्यासाठी बलिदान द्यावे लागले. हेच पाणी साठवण होत असलेल्या ठिकाणी चक्क भराव ठाकून धरण बुजवण्याचे काम करणाऱ्यावर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)