डिजिटल गावांच्या निर्मितीसाठी पुढाकार
By Admin | Updated: February 14, 2017 01:43 IST2017-02-14T01:43:18+5:302017-02-14T01:43:18+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ग्रामीम भागात डिजिटल

डिजिटल गावांच्या निर्मितीसाठी पुढाकार
पुणे: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ग्रामीम भागात डिजिटल गावा, डिजिटल शाळा, डिजिटल ग्रामपंचायत आणि डिजिटल आरोग्य केंद्रांच्या निर्मितीवर अधिक भर देण्यात आला आहे.
याशिवाय प्रत्येक गावांमध्ये सिमेंटचे रस्ते, पिण्याचे शुध्द पाणी, प्रत्येक गावांत व्यायाम शाळा अन् ज्येष्ठ नागरिकांसाठी वेरंगुळा केंद्र करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा जाहीरनाम्यात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.
जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसचा हा जाहीरनामा मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने व केलेली कर्तव्यपूर्ती यावर अधिक भर देण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक विभागनिहया दिलेली आश्वासने व केलेली कामे यांचा सविस्तर आढावा घेण्यात आले आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल ३ हजार ८५ कोटी रुपयांची कामे केली असल्याचे म्हटले आहे.
यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एका मोठ्या गावांमध्ये शाहू-फुले आंबेडकर ग्राम अभ्यासिका उभारण्यात येणार असून, संबंधित गाव परिसरातील विद्यार्थ्यांना युपीएसी, एमपीएसी अभ्यासक्रमासाठी याचा मोठ्या उपयोग होणार असल्याचे कंद यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ई-लर्निंग सुरु करणार, शंभर टक्के अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती देणार, मोठ्या गावांमध्ये शुध्द पाण्यासाठी आर.ओ यंत्र बसविणार, ग्रामीण भागात कच-यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, मोठ्या गावांसाठी कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभरण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शंभर टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जा प्रकल्प सबविण्यात येणार, सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविणार, शंभर टक्के शौचालय असलेल्या गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या जाहीरनाम्यात हजारो आश्वासने दिली असली तरी यातील बहुतेक आश्वासने ही सध्या सुरु असलेल्या सरकारी योजनाच आहेत. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे, तुकडा बंदी कायदा, रस्त्यांची दुरुवस्था किंवा कोणतही नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)