आयएसएमटी कंपनीत बेमुदत टाळेबंदी
By Admin | Updated: February 17, 2017 04:39 IST2017-02-17T04:39:55+5:302017-02-17T04:39:55+5:30
कोळविहिरे गावाच्या हद्दीतील सर्वांत मोठ्या आयएसएमटी या स्टील कंपनीने आजपासून बेमुदत टाळेबंदी जाहीर करून कंपनी बंद

आयएसएमटी कंपनीत बेमुदत टाळेबंदी
जेजुरी : कोळविहिरे गावाच्या हद्दीतील सर्वांत मोठ्या आयएसएमटी या स्टील कंपनीने आजपासून बेमुदत टाळेबंदी जाहीर करून कंपनी बंद केली आहे. कंपनीने टाळेबंदी करून कामगारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत कामगारांनी कंपनी गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कोळविहिरे गावाच्या हद्दीतील घाटेवाडी येथे आयएसएमटी ही स्टीलचे उत्पादन करणारी येथील सर्वांत मोठी कंपनी आहे. कंपनीत कायम ३२१ कामगार, १६५ अधिकारी व प्रशासकीय, तांत्रिक कर्मचारी, तसेच ७५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार आहेत. याशिवाय साधारणपणे दोन ते अडीच हजार कुटुंबांना या कंपनीचा फायदा होत आहे. या कंपनीने कामगारांचे सहकार्य मिळत नसल्याच्या कारणावरून आजपासून टाळेबंदी जाहीर केल्याने येथील कामगार वर्गात खळबळ माजली आहे. संतप्त कामगारांनी आज कंपनी गेटवर जमा होऊन कंपनी व्यवस्थापनाच्या या बेकायदेशीर टाळेबंदीचा निषेध केला आहे. गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील समन्वयासाठी या कंपनीत इस्साल एम्प्लॉईस युनियन असून युनियन आणि व्यवस्थापनात जानेवारी २०१४ पासून पगारवाढीबाबत संघर्ष सुरू आहे. ९ डिसेंबर २०१४ रोजी व्यवस्थापन आणि युनियन यांच्यातील बैठकीत ३३०० रुपयांचा पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, कंपनीने आर्थिक मंदीचे कारण सांगून कामगारांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. गेली तीन वर्षे कंपनीकडून कामगारांना पगारवाढ न देता केवळ वेळ काढूपणाच केला आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाकडे पगारवाढीचा आग्रह धरला असता कंपनीकडून या मागणीकडे दुर्लक्षच केले आहे. या संदर्भात कामगार आयुक्तांसमोर ही युनियन व व्यवस्थापनाच्या वारंवार बैठका होऊन ही कंपनी आर्थिक मंदीचेच कारण सांगून कामगारांच्या पगारवाढीकडे दुर्लक्ष करीत आहेत. कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली असता कंपनीने आजपासून टाळाबंदीचा निर्णय घेतला आहे. हा कामगारांवर सरळ सरळ अन्याय असून, जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन करण्याचा निश्चय केल्याचे युनियनचे जगन्नाथ बरकडे, शोभाचंद डोके, मधुकर घाटे, पोपट खोमणे, रवींद्र फुले, रोहित घाटे आदींनी सांगितले. (वार्ताहर)