भोर :महाड- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर चौपाटी येथे सुरू असलेल्या कारपेटच्या कामात डांबरात खडीचे मिश्रण करून कारपेट असते. मात्र, खडीच असून डांबर नसल्यामुळे तयार कारपेट करून रोलिंग केलेले निकृष्ट दर्जाचे काम नागरिकांनी उखडायला लावून पुन्हा नव्याने कारपेट करायला लावले आहे. कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह असून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
महाड-पंढरपूर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी यांच्याकडे हस्तांतर करण्यात आला आहे. सध्या या रस्त्यावरील वडगावडाळ ते आंबेघर या भोर तालुक्याच्या हद्दीतील सुमारे १० किलो मीटरच्या रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे ७ कोटी रु निधी मंजूर करण्यात आला आहे. कामाला सुरुवात झाली असून कारपेटचा पहिला लेअर टाकून झालेला आहे. ५.५ मीटर रुंद दोन्ही बाजूला एक एक मीटरच्या साईटपट्या आणी गटारे असे काम होणार आहे, त्यानंतर प्रत्येक ३ मीटरवर पांढरे पट्टे त्यानंतर सहा मीटर जागा सोडून पुन्हा पांढरे पट्टे मारले जाणार आहेत.मागील आठदहा दिवसांपासून कामाला सुरुवात झाली असून, १० किलोमीटरमधील कारपेटच्या एका लेअरचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. सध्या दुसरा लेअर टाकण्याचे काम सुरू आहे.
भोर शहरातील चौपाटी येथील शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याजवळ सुरू असलेल्या कारपेट टाकण्याच्या दुसऱ्या लेअरचे कारपेटच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, कारपेट करण्यासाठी मिक्सिंग केलेले खडी आणि डांबरात खडी अधिक आणि डांबर कमी होते, यामुळे कारपेटचे काम उखडण्याची भीती होती. त्यामुळे सदरचे खराब काम काही पत्रकार आणि नागरिक यांनी थांबावून राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना बोलावून कारपेट जेसीपीच्या मदतीने उखडून काढून कमी डांबरमिश्रित खडी बाहेर काढण्यात आली. शहरातील मुख्य चौक असलेल्या आणि रहदारीच्या रस्त्यावर
अशा पध्दतीने खराब काम होत असेल तर इतर काम कसे झाले असेल, असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
महाड व मांढरदेवीला जाणार महत्त्वाचा रस्ता भोर शहरातून कोकणात जाणारा आणि महाबळेश्वरला जाणारा जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. रस्त्यावरचे काम चांगल्या दर्जाचे होणे महत्त्वाचे आहे अन्यथा एका पावसातच रस्ता उखडण्याची भीती आहे.
भोर-महाड रस्त्यावर चौपाटी, ता. भोर येथे खराब झालेले काम उखडताना ठेकेदाराचे कर्मचारी फोटो