अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरीत भारताच्या रिया भाटियाला अग्रमानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:22+5:302021-03-09T04:11:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : २५ हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताची क्रमांक दोनची ...

अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरीत भारताच्या रिया भाटियाला अग्रमानांकन
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : २५ हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताची क्रमांक दोनची खेळाडू व सध्याच्या जागतिक क्रमवारीत ३५४ व्या स्थानी असलेल्या रिया भाटियाला एकेरी गटात अग्रमानांकन देण्यात आले आहे. दुहेरी गटात भारताच्या ऋतुजा भोसले व ग्रेट ब्रिटनच्या इमिली वेबली स्मिथ या जोडीला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेची आज मानांकन यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एकेरीत रोमानियाच्या मिरियम बलगारू व ब्राझिलियाच्या लौरा पिगॉस्सी यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले आहे. पुण्याच्या ऋतुजा भोसले व युक्रेनच्या मारियाना झकारल्यूक यांना अनुक्रमे चौथे व पाचवे मानांकन मिळाले आहे.
उदयोन्मुख भारतीय खेळाडू झील देसाई हिला सातवे मानांकन देण्यात आले आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या पंधरा हजार डॉलर स्पर्धेतील उपविजेती रशियाची इरिना क्रोमाचेव्हाला आठवे मानांकन देण्यात आले आहे. आयोजकांच्या वतीने एकेरीसाठी आकांक्षा नित्तुरे, सौम्या विज, स्नेहल माने, वैदेही काटकर यांना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे. स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या सामन्यांना मंगळवारपासून (९ मार्च) पासून सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे : एकेरी :
रिया भाटिया (भारत ३५४), मिरियम बलगारू (रोमानिया, ३६३), लौरा पिगॉस्सी (ब्राझील, ३७६), ऋतुजा भोसले (भारत, ४३३), मारियाना झकारल्यूक (युक्रेन, ४८८), इमिली वेबली स्मिथ (ग्रेट ब्रिटन, ५१९), झील देसाई (भारत, ६२२), इरिना क्रोमाचेव्हा (रशिया, ६३१);
दुहेरी गट :
१. ऋतुजा भोसले (भारत)/इमिली वेबली स्मिथ (ग्रेट ब्रिटन)
२. रिया भाटिया (भारत)/मिरियम बलगारू (रोमानिया)
३. सौजन्या बाविशेट्टी(भारत)/प्रार्थना ठोंबरे(भारत)
४. पिया लोवरीक(स्लोवाकिया)/ऍड्रिन नांगी(हंगेरी)