पुणे : गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत-इंग्लंड दरम्यानच्या एकदिवसीय सामन्यातील दुस-या एकदिवसीय सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणातील हव्या असलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहुल गायकवाड यांनी हा आदेश दिला.
अफझल सरदारी (रा. नागपूर) प्रकाश बावनानी (रा. नागपूर), सरबजीत ओबेरॉय (रा. नागपूर) अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत-इंग्लंड दरम्यान एकदिवसीय सामने सुरू असून, दुस-या एकदिवसीय सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी यापूर्वी ३७ आरोपीना पोलिसांनी आधीच अटक केलेली आहे. वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली होती. अटक केलेले आरोपी मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गोव्यातील आहेत. त्यांच्या जवळून ७५ मोबाइल, तीन लॅपटॉप, एक टॅब, आठ कॅमेरे, चार दुर्बीण, एक स्पीकर, चार कार आणि एक लाख २६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये काही विदेशी चलनाचाही समावेश आहे. दि. २६ मार्च ही कारवाई करण्यात आली होती. यामध्ये हे तिघेही आरोपी हवे होते. वडगाव येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी राहुल गायकवाड यांच्या समोर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळे यांच्या मार्फत आरोपींना हजर करण्यात आले . दरम्यान सरकारी वकिलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद करून आरोपींना पोलीस कस्टडी देण्याची मागणी केली. परंतु आरोपीच्या वकिलांनी त्यास विरोध केला. पोलिसांनी लावलेली कोणतेही अजामीनपात्र कलमे आरोपींना लागत नाहीत. कारण हे आरोपी हे घटनास्थळी नव्हते. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कोणताही मज्जाव केलेला नसून, सरकारी कामात अडथळा आणलेला नाही. तसेच आरोपींनी करोना काळातील नियमावलीचा भंग देखील केलेला नाही तसेच आरोपी हे पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत. असा आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले. आरोपी तर्फे अॅड. सचिन झालटे, अॅड. रियाज तांबोळी,अॅड. हितेश खांदवानी, अॅड. अभिषेक जगताप यांनी काम पहिले.
-----