मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ सांस्कृतिक चैन ठरेल

By Admin | Updated: January 11, 2015 00:57 IST2015-01-11T00:57:16+5:302015-01-11T00:57:16+5:30

मराठी भाषा सल्लागार समितीने केलेल्या अनेक शिफारशींमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी सांस्कृतिक चैन ठरेल.

An independent university for Marathi will be a cultural affair | मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ सांस्कृतिक चैन ठरेल

मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ सांस्कृतिक चैन ठरेल

पुणे : मराठी भाषा सल्लागार समितीने केलेल्या अनेक शिफारशींमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी सांस्कृतिक चैन ठरेल. त्यापेक्षा मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था समन्वयाने कार्यरत होण्याची गरज असून, त्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस शिक्षणतज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी केला.
‘पाखरांची शाळा’, मूलांच्या मूल्यकथा’, ‘मोहनदास करमचंद’ यांसारख्या शिक्षण, बालसाहित्य आणि वैचारिक आदी विविध विषयांवरील पुस्तकांच्या माध्यमातून मराठी साहित्यासह शैक्षणिक क्षेत्रातही अमूल्य योगदान दिलेले डॉ. न. म. जोशी हे रविवारी ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचाही हाच जन्मदिन आहे. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबत ‘लोकमत’ने डॉ. जोशी यांच्याशी संवाद साधला.
मराठी भाषेचे संवर्धन, इंग्रजीच्या वर्चस्वामुळे बंद पडत असलेल्या मराठी शाळा, भाषा धोरण आदी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, स्वतंत्र विद्यापीठाची शिफारस आदर्श म्हणून ठीक आहे. पण, महाराष्ट्रामध्ये जी काही विद्यापीठे आहेत, त्यामध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग आहेत. त्यांचे कार्य कोणत्या प्रमाणात कमी पडते? तरीही स्वतंत्र विद्यापीठ करायचे झाल्यास त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविला गेला पाहिजे, अन्यथा हे विद्यापीठ म्हणजे सांस्कृतिक चैन ठरेल.
डॉ. जोशी म्हणाले, ‘‘ मराठी भाषा सल्लागार समितीने भाषेचे पुढील पंचवीस वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी शासनाला सादर केलेल्या मसुद्यामध्ये ज्या अनेक शिफारशी केल्या आहेत, त्या तात्त्विकदृष्ट्या चांगल्या आहेत. मात्र, मराठी भाषेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जो ठोस कृती कार्यक्रम आवश्यक आहे, त्याचा विचार खूप कमी प्रमाणात करण्यात आला आहे. कोणतीही भाषा ही कुटुंबात समाजात अनौपचारिकपणे आणि शिक्षणक्रमात औपचारिकपणे शिकविली जाते. भाषा संवर्धनात अध्ययन, अध्यापन प्रक्रियेचा मोठा संबंध असतो. याबद्दलचा विचार या शिफारशीमध्ये होणे अपेक्षित होते. स्वतंत्र विद्यापीठ असावे, हे आदर्शवत वाटत असले, तरी आज पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी विद्यापीठे असून, त्यामध्ये स्वतंत्र मराठी विभाग आहेत. मात्र, त्यांचे कार्य कोणत्या प्रमाणात कमी पडते म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे, याचा उलगडा झालेला नाही. (प्रतिनिधी)

४भाषेशी संबंधित काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ आदी विविध स्वतंत्र संस्था आहेत. त्यांच्या समन्वयाने सक्षमपणे कार्य करण्यावर भर दिला गेला पाहिजे. म्हणूनच भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या शिफारशीचा पुनर्विचार व्हायला हवा. बालवाडीपासून ते मराठी भाषेच्या संशोधकांपर्यंत सर्वांसाठी कृतिशील कार्यक्रम आखला जावा. मराठी भाषेसाठी चांगले विकास कार्य करण्यास आपण कमी पडत आहोत म्हणूनच मराठी शाळा बंद पडत आहेत का? याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा, याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले.

Web Title: An independent university for Marathi will be a cultural affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.