देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र नियमावली
By Admin | Updated: January 28, 2015 02:39 IST2015-01-28T02:39:15+5:302015-01-28T02:39:15+5:30
केवळ ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी गरज नसतानाही देखभाल दुरुस्तीच्या कामावर महापालिका प्रशासनाकडून केली जाणारी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आता थांबणार आहे

देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र नियमावली
सुनील राऊत, पुणे
केवळ ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी गरज नसतानाही देखभाल दुरुस्तीच्या कामावर महापालिका प्रशासनाकडून केली जाणारी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आता थांबणार आहे. या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या नियमावलीत कोणते काम कधी आणि किती दिवसांनी करावे यासाठी बंधने घालण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने, रस्त्यावर बसविले जाणारे पेव्हिंग ब्लॉक, पथदिवे, पथदिव्यांचे खांब, कार्यालयांची रंगरंगोटी, विद्युत विभागांतर्गत केल्या जाणाऱ्या कामांसह अंदाजपत्रकातील शेकडो कामांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही नियमावली तयार करण्याच्या सूचना एस्टीमेट कमिटीस दिल्या आहेत.
महापालिकेकडून नागरिकांच्या रकमेतून दर वर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जातात. त्यात प्रामुख्याने, रस्ते, कचरा, ड्रेनेज, पथदिवे, पेव्हिंग ब्लॉक, पाणीपुरवठा यांची कामे असतात. या कामांव्यतिरिक्त नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून समाजमंदिरे, व्यायामशाळा, बागांमध्ये बाकडे, प्रभागात शोभेचे पथदिवे, उद्यानांमध्ये खेळणी, शाळांची बांधणी, नागरिकांना कचरा बकेटचे वाटप, ज्यूट पिशव्यांचे वाटप, वाचनालये अशी अनेक कामे केली जातात. प्रत्यक्षात या कामांसाठी लाखो रुपये खर्च झाला असताना, प्रत्यक्षात दर वर्षी त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्यापेक्षाही जादा निधी खर्च केला जातो. त्यामुळे यापुढे आता देखभालीच्या कामांना मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता एखादे काम केल्यानंतर त्याची दुरुस्ती नक्की किती दिवसांनी आवश्यक आहे, हे ठरविण्यासाठी ही नियमावली असणार आहे. (प्रतिनिधी)