ठेकेदार, थर्ड पार्टीच्या कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी ‘स्वतंत्र कक्ष’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:19+5:302021-02-23T04:16:19+5:30
पुणे : महापालिकेकडून ठेकेदारामार्फत कामे करवून घेतली जातात. या कामांचे आवश्यकतेनुसार त्रयस्थ गुणवत्ता तपासणी करणाऱ्या (थर्ड पार्टी) संस्थांच्या कामांचीही ...

ठेकेदार, थर्ड पार्टीच्या कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी ‘स्वतंत्र कक्ष’
पुणे : महापालिकेकडून ठेकेदारामार्फत कामे करवून घेतली जातात. या कामांचे आवश्यकतेनुसार त्रयस्थ गुणवत्ता तपासणी करणाऱ्या (थर्ड पार्टी) संस्थांच्या कामांचीही आता तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या समितीमध्ये सात सदस्यांची नेमणूक केली असून, याबाबतचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले आहेत.
महापालिकेकडून शहरात विकासकामे केली जातात. पालिकेमार्फत निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांची नियुक्ती केली जाते. अनेकदा ठेकेदारांच्या कामाबाबत तसेच विकासकामांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जातात. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केलेल्या तपासणीवरही संशय व्यक्त केला जातो. तक्रारी झालेल्या कामांचे अगर प्रकल्पांची त्रयस्थ गुणवत्ता तपासणी संस्थेकडून (थर्ड पार्टी) केली जाते.
परंतु, गेल्या काही महिन्यांत थर्ड पार्टी तपासणीवरही संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यांच्याकडूनही पारदर्शकपणे काम होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. नगरसेवकांकडूनही या प्रक्रियेवर आक्षेप नोंदविण्यात येतात. त्यामुळे आता थर्ड पार्टी कामांचीच तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहआयुक्त, पाचही परिमंडलांचे उपायुक्त, मुख्य खाते यांच्याकडील विकासकामांच्या तसेच थर्ड पार्टी संस्थेच्या कामांची तपासणी करण्यासाठी दक्षता विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
या कक्षासाठी सात अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यामध्ये दक्षता विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन देशपांडे, निविदा कक्षाचे उपअभियंता योगेंद्र सोनवणे, पाणीपुरवठ्याचे नितीन खुडे, पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता पवन मापारी, प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता विजय दाभाडे, भवन रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता गजानन शर्मा, उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता गोपाळ भंडारी यांचा समावेश आहे. त्यांना त्यांचे नैमित्यिक कामकाज सांभाळून या कक्षाचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.