इंदापूर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम
By Admin | Updated: February 24, 2017 02:04 IST2017-02-24T02:04:19+5:302017-02-24T02:04:19+5:30
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषद गटाच्या

इंदापूर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम
इंदापूर : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषद गटाच्या दोन जागा जादा मिळविल्या. मात्र, पंचायत समितीवर पुन्हा हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वखालील काँग्रेस पक्षाने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे पंचायत समितीवर सत्ता मिळविण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न अपुरे राहिले.
मागील पंचवार्षिकमध्ये एकूण सात जागांपैकी काँग्रेसकडे पाच जागा होत्या. पंचायत समितीच्या चौदापैकी नऊ जागा होत्या. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी व काटी-वडापुरी या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या. गणांपैकी शेटफळगढे, पळसदेव, लाखेवाडी, वडापुरी या गणावरची त्यांची सत्ता गेली. राष्ट्रवादी काँग्रेसची सणसर-लासुर्णे गटावरची सत्ता गेली. शेटफळगढे, पळसदेव, वडापुरी, लाखेवाडी या गणांवर व काटी-वडापुरी या गटावर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली.
पळसदेव बिजवडी गटातून सोनाई उद्योगसमूहाचे संचालक प्रवीणकुमार माने यांनी पहिल्यांदाच राजकीय निवडणुकीसाठी पाऊल उचलले होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज कार्यकर्ते दीपक जाधव यांनी उमेदवारी दाखल केली होती.
या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. दोघांनी ही उत्तम प्रचार यंत्रणा राबवली. सर्वाधिक शक्तिप्रदर्शन, सभा या गटात झाल्या.
या निवडणुकीदरम्यान कळस पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवृत्ती गायकवाड यांनी काँग्रेसशी घरोबा केला होता. त्याचा काँग्रेसला काहीही फायदा झाला नाही. पोटनिवडणुकीत प्रताप पाटील विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील भरघोस मतांनी निवडून आल्या.
त्यांच्या कळस गावात त्यांना अकराशे मतांचे अधिक्य मिळाले. माजी आमदार कै. गणपतराव पाटील यांच्या घराण्याची प्रतिष्ठा कायम असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. भवानीनगरच्या अविनाश घोलप यांना या निवडणुकीने कही खुशी कही गमचा अनुभव दिला. सणसर गणातून घोलप यांचा मुलगा करणसिंह घोलप यांनी विजय मिळविला. त्यांची पत्नी वंदनादेवी घोलप यांना कळस-वालचंदनगर गटातून पराभवाचा सामना करावा लागला.(वार्ताहर)