आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ इंदापूरला महामार्ग रोखला
By Admin | Updated: March 23, 2017 04:10 IST2017-03-23T04:10:52+5:302017-03-23T04:10:52+5:30
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. २२) सायंकाळी पाच वाजता

आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ इंदापूरला महामार्ग रोखला
इंदापूर : आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. २२) सायंकाळी पाच वाजता पंचायत समितीसमोर एक तास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, शहराध्यक्ष अनिल राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सपकळ, नगरसेवक श्रीधर बाब्रस, विकास खिलारे, बाळासाहेब व्यवहारे, कालिदास देवकर, वसंत आरडे, रमेश पाटील, संपत पवार व इतरांनी या आंदोलनात
सहभाग घेतला. या वेळी बोलताना महारुद्र पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव मिळावा, याकरिता विधिमंडळात आंदोलन करणाऱ्या आमदारांना निलंबित करण्याची कारवाई भाजपा सरकारने केली आहे. ही कारवाई करून भाजपाने शेतकऱ्याच्याच गळ्याला गळफास दिला आहे.
ते म्हणाले, की सत्तेत येण्याआधी मोठ्या गोष्टी सांगणाऱ्या या पक्षाने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची पिळवणूक चालू केली
आहे.
त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करीत आहे. या वेळी अमोल भिसे, रमेश पाटील व इतरांची भाषणे झाली. (वार्ताहर)