मान्सूनच्या तोंडावर लॉकडाऊनमुळे इंदापूरचे शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:50+5:302021-05-14T04:11:50+5:30
(सतीश सांगळे) लोकमत न्यूज नेटवर्क कळस : इंदापूर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. ...

मान्सूनच्या तोंडावर लॉकडाऊनमुळे इंदापूरचे शेतकरी अडचणीत
(सतीश सांगळे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कळस : इंदापूर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात रुग्णाची दैनंदिन ३०० संख्या असताना प्रशासन सुस्त होते. मात्र, तीच संख्या प्रतिदिन १०० पर्यंत संख्या खाली आली असताना तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करून वरातीमागून घोडे दामटल्याची टीका शेतकरी करीत आहेत. हा लॉकडाऊन मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे यामुळे शेतीव्यावस्था उद्ध्वस्थ होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यात लाॅकडाऊन ११ मे ते १७ मे सात दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांची गळचेपी केली आहे. तालुक्यात हजारो हेक्टरवर द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला पिके आहेत. सर्व पिके अडचणीत आली आहेत. शेती व शेतीविषयक कामांशी संबंधित औषधे, बी-बियाणे खते, औजारे यांची दुकाने पूर्णवेळ बंद राहणार आहेत. तसेच उत्पादित मालाला बाजारपेठ मिळणार नाही. फळे-फुले व भाजीपाला आडत दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे उत्पादित मालांचेही नुकसान होणार आहे, खरीप हंगामाच्या तोंडावर बँकाचे कामकाजही ग्राहकांसाठी या आदेशाने बंद ठेवण्यात आल्याने शेती व पूरक व्यवसायासाठी कर्जपुरवठा ठप्प झाला आहे. सर्व राष्ट्रीय व सहकारी बँकांनी या आदेशाने कर्जपुरवठा थांबवला आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा शेतकरी मोठा अडचणीत आला आहे.
प्रशासनाने किमान काही तासांचा कालावधी देऊन दुकाने व बँका सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो रुपयांचा फळे व भाजीपाला या लॉकडाऊनमुळे कुठं विकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या विसंगत निर्णयामुळे गरीब शेतकऱ्यांना हे नुकसान सोसावे लागत आहे. विक्रीसाठी आलेला लाखो रुपये किमतीचा भाजीपाला उन्हामुळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना अखेर तो फेकून द्यावा लागणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि किरकोळ भाजी मार्केट बंद ठेवणे, हा निर्णय पूर्णपणे प्रशासनाची चूक आहे.
कोट
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केले आहे, सर्व बँका या कालावधीत ग्राहकांसाठी बंदच असणार आहेत, त्याच प्रमाणे रेशन दुकानेही बंद राहतील. नागरिकांनी सात दिवसांच्या कालावधीकरिता घरीच थांबून सहकार्य करावे.
तहसीलदार, अनिल ठोंबरे, इंदापूर
—————————————