हौसेखातर वाढते प्रदूषण
By Admin | Updated: December 17, 2014 05:33 IST2014-12-17T05:33:55+5:302014-12-17T05:33:55+5:30
शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे आणि बीआरटी, मेट्रोसारखे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यामुळे गरज म्हणून नागरिकांचा खासगी गाड्या घेण्याकडे कल वाढला आहे

हौसेखातर वाढते प्रदूषण
अमोल जायभाये, पिंपरी
शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे आणि बीआरटी, मेट्रोसारखे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यामुळे गरज म्हणून नागरिकांचा खासगी गाड्या घेण्याकडे कल वाढला आहे. रस्त्यावर साडेअकरा लाखांपेक्षा जास्त वाहने धावत आहेत. चारचाकी गाडी असणे, हे प्रतिष्ठेचे मानले जाते. हौसेखातर दुचाकी गाड्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात सध्या ११ लाख ५४ हजार ४२३ वाहने धावत आहेत. त्यात दुचाकीचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये महिन्याला १० हजार वाहनांची त्यात भर पडत आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून शहरात सध्या ८ लाख ४४ हजार ९४८ दुचाकी आहेत. या वर्षी ८८ हजार ८०५ गाड्या वाढल्या आहेत. त्या पाठोपाठ १ लाख ८० हजार ५४२ मोटारी आहेत. या वर्षी २० हजार ५०६ मोटारींची भर पडली आहे. सर्वाधिक दुचाकी असल्यामुळे शहराच्या वाहतूक कोंडीतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. यात अनेक महागड्या गाड्या आहेत.
प्रत्येक घरामध्ये कोणती ना कोणती गाडी दिसून येते. त्यामध्ये दुचाकी, तर प्रत्येक दारासमोर असतेच. मात्र, त्यामुळे शहरातील प्रदुषणात वाढ होत आहे. त्यामध्ये अनेक गाड्या जुन्या असल्याने त्यांची पीयूसी व्यवस्थित केली जात नाही. त्याचा परिणामही नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
मोठ्या प्रमाणात गाड्या वाढत असल्याने येथील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहत आहे. कंपनीतील कर्मचारी आणि सरकारी नोकर या वर्गात दुचाकी घेण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. एवढ्या गाड्या असल्यामुळे येथील रस्तेही कमी पडत आहेत. लोकसंख्या वाढत आहे. त्याच प्रमाणात गाड्याही वाढत आहेत. मात्र रस्ते तेच असल्याने आज वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे.
गाड्यांच्या धुरामुळे शहर परिसराचे वातावरण दुषित होत आहे. त्यामध्ये मुदत संपलेली वाहनेही बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ही वाहने प्रदूषणात भरच टाकत आहेत. इतर गाड्याही मोठ्या प्रमाणात आहेत. येथे कंपन्या अधिक असल्यामुळे १४ हजार ४१३ ट्रकची नोंद आहे.