increasing agent system in Baramati Sub-Regional Transport Office | बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटगिरीला ऊत
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटगिरीला ऊत

ठळक मुद्देसर्वसामान्यांना फटका : एजंटकडून कामे करवून घेण्यासाठी अधिकारी करतात प्रवृत्त एजंटमुळे तब्बल २ ते ४ हजारांपर्यंतचा फटका वाहन परवान्यासाठी शासकीय शुल्कापेक्षा दहापट रक्कम एजंट उकळतात

- रविकिरण सासवडे - 
बारामती : बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तुम्ही कोणत्याही कामानिमित्त मध्यस्थाशिवाय (एजंट) गेलात... तर थांबा. कारण, येथील कर्मचारी व अधिकारी तुमचे काम करणार नाहीत. कोणत्याही किरकोळ कामासाठी येथील अधिकारी व कर्मचारी तुम्हाला पुन्हा एजंटकडेच पाठविणार. त्यामुळे १०० ते १५० रुपये शासकीय मूल्य भरून होणाऱ्या कामासाठी तुम्हाला एजंटमुळे तब्बल २ ते ४ हजारांपर्यंतचा फटका बसू शकतो. या एजंटगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ पाहणीत आढळून आला. 
आरटीओ कार्यालयात प्रवेश केल्याबरोबरच भलीमोठी गर्दी दिसून आली; तसेच याठिकाणी आरडाओरडादेखील पाहायला मिळाला. मालवाहतूक गाडीच्या परवान्यासाठी आलेल्या बारामती येथील प्रमोद पाटसकर यांना मागील काही दिवसांपासून संबंधित अधिकारी वाहन परवाना देत नसल्याची तक्रार पाटसकर यांनी केली. मोटार वाहन निरीक्षक प्रमोद खटावकर यांच्याकडे तक्रार करताना पाटसकर म्हणाले की, मी कोणताही मध्यस्ताकडे (एजंट) न जाता वाहन परवान्यासाठी स्वत: सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, येथील अधिकारी मला वाहन परवाना देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. प्रत्येक वेळी हेलपाटे मारावे लागत आहेत; तसेच संबंधित अधिकारी आमच्यावर आरडाओरडा करून अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे येथे थेट काम घेऊन येणारी व्यक्ती पुन्हा एजंटकडेच गेली पाहिजे, अशा पद्धतीने प्रवृत्त केले जाते. माझ्या मालवाहतूक गाडीचा वाहन परवाना मला अद्याप मिळाला नाही. त्यासाठी मी फेब्रुवारी महिन्यापासून स्वत: कोणताही एजंट मध्ये न घालता प्रयत्न करीत आहे. संबंधित अधिकाºयाला माहिती विचारली असता केवळ तात्पुरती माहिती दिली जाते.  संपूर्ण माहिती दिली जात नाही. त्यामुळे मला सारखे हेलपाटे मारावे लागले. येथील एजंटगिरी संपल्याशिवाय नागरिकांची कामे होणार नाहीत. 
तसेच, अधिकारी सरळपणे नागरिकांशी वागणार नाहीत, अशी तक्रार पाटसकर यांनी केली. पाटसकर हे मोटार वाहन निरीक्षक प्रमोद खटावकर यांच्याकडे कार्यालयातील एजंटगिरीची तक्रार करीत असताना येथील सर्व एजंटनी खटावकर यांच्या कक्षाजवळ एकच गर्दी केली होती. 
...........
वाहन परवान्यासाठी शासकीय शुल्कापेक्षा दहापट रक्कम एजंट संबंधित वाहनमालकांकडून उकळतात. रक्कम घेऊनही वाहन परवाना देण्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. या वेळेत वाहनमालक चौकशी करायला गेल्यास त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते. तर, काही एजंट पैसे घेऊनही वाहन परवान्यासाठी अर्धवट माहिती आरटीओ कार्यालयाकडे सादर करतात. त्यामुळे पुन्हा नव्याने माहिती सादर करण्यासाठी वाहनचालकाच्या खिशाला खड्डा पडतो. ऑनलाइनच्या कामाबाबत नागरिकांच्या अज्ञानपणाचा फायदा एजंट उठवत असल्याचे चित्र आहे.
.......
संबंधित अधिकाऱ्याविषयी लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे. लेखी तक्रार आल्यानंतर, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू.- प्रमोद खटावकर, मोटार वाहन निरीक्षक, बारामती , उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
............
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) म्हणजे एजंटगिरीचा अड्डा बनल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे; तसेच या प्रकाराला खुद्द आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच  खतपाणी घालत असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. सर्व व्यवहार ऑनलाईन करून या कार्यालयाने काही प्रमाणात एजंटगिरीला अन्य पर्यायाने भ्रष्टाचाराला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. 
......
आरटीओमध्ये पाऊल ठेवले की, उच्चशिक्षित व्यक्तीही गोंधळून जाते. कारण, येथे कोणत्या कामासाठी कोणता फॉर्म भरायचा, हे समजत नाही. रक्कम कुठे भरायची,  कागदपत्रे काय लागतात, हे सर्व समजून घेईपर्यंत नाकीनऊ येत होते. याशिवाय येथे बराच वेळ वाया जातो, हे वेगळेच. त्यामुळे नकोच तो व्याप म्हणून अनेकजण आरटीओशी संबंधित कोणतेही काम असले, तरी थेट एजंटला गाठून त्याला ठराविक रक्कम देऊन करून घेत होते. यामुळेच येथे  प्रचंड प्रमाणात एजंटगिरी बोकाळली आहे. 
........
४मालवाहतूक गाडीचा कच्चा परवाना काढलेला जवळपास तीन महिने होऊन गेले. याकामासाठी एजंटला जवळपास चार ते साडेचार हजार रुपये दिले. येथील जास्त माहिती नसल्याने येथील भोंडवे या एजंटकडे माझे काम दिले होते. संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशी केली. अधिकारी व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. 
..........
पुढच्या खिडकीकडे जा, असे सांगतात. त्यामुळे एजंट किंवा अधिकाऱ्याला याचा जाब विचारला असता माझी गाडी वेळेत आली नसल्याचे कारण देऊन मला परवाना नूतनीकरण करण्यास सांगितले. भोंडवे या एजंटने पुन्हा यासाठी माझ्याकडे अडीच हजार रुपये मागितले, अशी माहिती मोरगाव येथील सुभाष राजाराम तावरे 
यांनी दिली. 
..............


Web Title: increasing agent system in Baramati Sub-Regional Transport Office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.