दुष्काळी भागात पाण्याची दाहकता वाढली
By Admin | Updated: September 30, 2015 01:16 IST2015-09-30T01:16:25+5:302015-09-30T01:16:25+5:30
पाण्याची भीषण टंचाई... जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न... वाढत चाललेला बेरोजगार हा दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील लोकांच्या पाचवीलाच पुजलेला.

दुष्काळी भागात पाण्याची दाहकता वाढली
खोर : पाण्याची भीषण टंचाई... जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न... वाढत चाललेला बेरोजगार हा दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील लोकांच्या पाचवीलाच पुजलेला. या भागाच्या पाण्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केलेले असून आगामी महिन्यात वरुणराजाने जर पाठ फिरवली तर पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन टंचाईच्या भीषणतेची मोठी झळ भासणार असल्याचे या भागामधील एकंदरीत चित्र आहे.
मोठ्या आशा पल्लवीत करीत या भागातील शेतकरीवर्गाने खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, ऐन सुगीचा हंगाम केवळ पावसाच्या लांबणीने वाया गेला. या भागामधील जवळपास ३० टक्केच खरिपाचा हंगाम चांगल्या प्रकारे डौलारा धरू शकला. ७० टक्के खरीप हंगामाच्या पेरण्या या केवळ पाण्याअभावी वाया गेल्या. या भागाच्या पाणीप्रश्नावर आमदार राहुल कुल हे सातत्याने विधानसभेत पाठपुरावा करीत आहेत. पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलाव व जनाई-शिरसाई योजनेतून पद्मावती तलाव भरून द्यावा, अशी खोर भागामधील शेतकऱ्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून जनाई योजनेतून पद्मावती तलावात पाणी सोडण्यात आले होते. मात्र वर्षातून किमान दोन तरी आवर्तने पुरंदर योजनेतून व जनाई योजनेतून सोडण्याची सरपंच रामचंद्र चौधरी यांची व ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)