स्वाइन फ्लूची वाढली तीव्रता
By Admin | Updated: March 9, 2015 00:53 IST2015-03-09T00:53:31+5:302015-03-09T00:53:31+5:30
शहरात स्वाइन फ्लूच्या अकराव्या बळीची रविवारी नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक चौघांचे प्राण गेले आहेत.

स्वाइन फ्लूची वाढली तीव्रता
पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूच्या अकराव्या बळीची रविवारी नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक चौघांचे प्राण गेले आहेत. स्वाइन फ्लूचे संकट अजूनही दूर होत नसल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.
उन्हाळ्याची सुरुवात झालेली असतानाही मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आतापर्यंतचे सर्वाधिक चार जणांचे बळी स्वाइन फ्लूने घेतले आहेत. त्यातील तीन महिला आहेत. दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. यामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग झपाट्याने फैलावत असल्याचे दिसत आहे.
जोनिका भरतकुमार पटेल (वय ४०, रा. मोशी प्राधिकरण) असे स्वाइन फ्लूने मरण पावलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांना ३ मार्चला दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी ४ मार्चला दुपारी साडेचारला त्यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी त्याच्या थुंकीचे नमुने वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शनिवारी, ७ मार्चला त्यांना स्वाइन फ्लूचे झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले. शहरात या आजाराने बळी गेलेल्या त्या अकराव्या रुग्ण आहेत. एका आठवड्यातील हा चौथा बळी आहे. स्वाइन फ्लूमुळे खडकीतील ५५ वर्षांच्या महिलेचा १ मार्चला, वाकडमधील ३२ वर्षांच्या तरुणाचा ३ मार्चला आणि स्पाइन रोड, मोशी येथील ४५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू दुसऱ्या दिवशी ४ मार्चला झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.
नव्या वर्षापासून स्वाइन फ्लूची लागण होण्याचे प्रमाण दिसू लागले. आजाराने २१ जानेवारीला पिंपळे गुरव येथील ४१ वर्षांच्या व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तो शहरातील पहिला मृत्यू होता. पाठोपाठ तळेगाव दाभाडेतील तरुणाचा मृत्यू झाला. जानेवारीत या आजाराने दोघे मरण पावले.
फेब्रुवारीत आजाराची तीव्रता वाढत गेली. एकूण ५ जणांचा मृत्यू या महिन्यात झाला. १ तारखेला आंध्रप्रदेश येथील ४८ वर्षांच्या आणि पिंपळे निलख येथील ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. चिंचवडच्या ३४ वर्षीय तरुणाचा १३ तारखेला मृत्यू झाला. १८ तारखेला खेड तालुक्यातील मरकळ येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मोहननगर, चिंचवड येथील ५९ वर्षांच्या व्यक्तीचा अंत झाला. या व्यतिरिक्त पुण्यातील रुग्णालयात पिंपरी-चिंचवडचे तीन रुग्ण उपचारादरम्यान मरण पावले आहेत.
जाहीर कार्यक्रमात आणि गर्दीच्या ठिकाणी जाणीवपूर्वक मास्क लावला जात आहे. देहूगावात शनिवारी झालेल्या संत तुकाराममहाराज बीज सोहळ्यात मास्क लावलेले भक्त वावरत होते. तसेच, पोलीस आणि शासकीय कर्मचारी मास्क लावून काळजी घेत होते. सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच शिवजयंती कार्यक्रमातही मास्कचा वापर करणारे अनेक जण होते. रुग्णालयात रुग्णास भेटण्यास जाणारे नातेवाईक आणि मित्रमंडळी आवर्जून तोंडास मास्क लावण्याची दक्षता घेतात. दुचाकी वाहनचालकही तोंडास मास्क किंवा रुमाल बांधून वावरत आहेत. वैद्यकीय विभागाने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.(प्रतिनिधी)