दक्षिण मुख्यालयाच्या रुग्णालयांची ऑक्सिजन खाटांची क्षमता वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:55+5:302021-05-14T04:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. देशातील आराेग्य यंत्रणेवर ताण ...

दक्षिण मुख्यालयाच्या रुग्णालयांची ऑक्सिजन खाटांची क्षमता वाढवली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. देशातील आराेग्य यंत्रणेवर ताण येत असताना सशस्त्र दले आता पुढे आली आहे. देशात विविध भागात ऑक्सिजन तसेच वैद्यकीय साधनांच्या पुरवठ्यास लष्करी रुग्णालयेही सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे. दक्षिण मुख्यालया अंतर्गत येणाऱ्या लष्करी रुग्णालयातही विविध सुविधा दिल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी या रुग्णालयातील ऑक्सिजन खाटांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. ३० टक्क्यांहून ही क्षमता ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याचे लष्करी आरोग्य सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्रस्त आहे. या काळात सामान्य नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सशस्त्रदल पुढे आली आहेत. हवाई, नाैदल आणि लष्करातर्फे मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या जात आहे. त्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालयही आघाडीवर आहे. दक्षिण मुख्यालया अंतर्गत ११ राज्य आणि पाच केंद्रशासित प्रदेश येतात. कोरोनाची ६१ टक्के रुग्ण या क्षेत्रात आढळले आहेत.
या बाबत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन म्हणाले की, मुख्यालयाच्या क्षेत्रातील लष्करातील जवानांना त्यांच्या कुटुंबीयांना, तसेच माजी सैनिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, ऑक्सिजन खाटांअभावी दवाखान्यात त्यांना प्रवेश नाकारला जाऊ नये या हेतूने लष्कराच्या रुग्णालयात ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन द्यावा लागतो. यासाठी त्या प्रमाणात दवाखान्यात ही सेवा असणे गरजेचे आहे. यामुळे पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आणि विशेषत: ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या दृष्टीने सर्व अडथळे दूर करण्याचा आमचा प्रयत्त्न आहे. यासोबतच या विभागात लसीकरण मोहीमेचा वेगही वाढवण्यात आला आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यालयांतर्गत येणाऱ्या २५ रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असणारे १३०० बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. जवान, माजी सैनिक, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ दिला जात असल्याचे, आर्मी मेडिकल कॉर्पच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरीच विलगीकरणात राहावे. त्यांना घरपोच तसेच ‘सेहत’ या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेचा लाभ दिला जात आहे.
चौकट
लसीकरणावर भर
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणावर आमचा भर असल्याचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी सांगितले. दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही जण पॉझिटिव्ह आढळले. मात्र, त्यांच्यात साैम्य लक्षणे होती. १८ पेक्षा पुढील तरुणांचे लसीकरणाचा निर्णय राज्य शासनाच्या धोरणावर अवलंबून राहणार आहे. मुख्यालयाच्या क्षेत्रात कोविड केअर सेंटर वाढवण्याचा प्रयत्न आहे. पुण्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी कमांड हॉस्पिटलचे रूपांतर समर्पित कोविड रुग्णलयात करण्यात आले आहे. या ठिकाणी ४० हून अधिक ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड आहेत.