शुल्कवाढीचा पीएमपी, एसटीला फटका
By Admin | Updated: February 14, 2016 03:23 IST2016-02-14T03:23:08+5:302016-02-14T03:23:08+5:30
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाना शुल्क तसेच नूतनीकरणाच्या शुल्कात राज्य शासनाकडून वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे परवाना शुल्क ४०० रुपयांवरून १००० रुपये
शुल्कवाढीचा पीएमपी, एसटीला फटका
पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाना शुल्क तसेच नूतनीकरणाच्या शुल्कात राज्य शासनाकडून वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे परवाना शुल्क ४०० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आले आहे. याचा फटका शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)सह राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या पुणे विभागातील बसलाही बसणार आहे. या दोन्ही वाहतूक व्यवस्थांच्या प्रत्येकी १२०० बसची नोंदणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आहे, तर या वाहनांनाही काही ठराविक कालावधीनंतर वाहन परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.
गृह विभागाने महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ मधील नियम ७५ मधील परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी मोटार वाहनांकरिता नवीन परवाने, परवाना नूतनीकरण, राष्ट्रीय परवाना, पर्यटक परवाना, तात्पुरता परवाना प्रतिस्वाक्षरी परवाना आदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे, तर परवाना शुल्कवाढ करतानाच, वाहनांच्या नूतनीकरणाच्या दंडाच्या रकमेतही राज्य शासनाने पन्नास पटीने वाढ केली असून, हे विलंब शुल्क प्रतिमहिना १०० रुपयांवरून तब्बल ५ हजार रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीत टप्पा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी नवीन नूतनीकरण करण्यासाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागत होते. आता हे शुल्क एक हजार रुपये करण्यात आले आहे. शहरात पीएमपीच्या मालकीच्या तब्बल १२०० बस आहेत. या बसच्या परवाना नूतनीकरणासाठी पीएमपीला प्रतिबस ४०० रुपयांचा खर्च येत होता. आता खर्च प्रतिबस १ हजार रुपये झाल्याने परवाना नूतनीकरणासाठी आता पीएमपीला १२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
राज्य शासनाशी पत्रव्यवहार सुरू
या शुल्कात वाढ झाल्याने आता या करात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे परवाना शुल्कवाढीतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना दिलासा मिळावा, या मागणीसाठी राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.