जबरी चोऱ्यांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: August 2, 2014 04:04 IST2014-08-02T04:04:53+5:302014-08-02T04:04:53+5:30
रस्त्याने जात असलेल्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन आठवड्यांत अशा दोन घटना घडल्या आहेत

जबरी चोऱ्यांच्या संख्येत वाढ
पुणे : रस्त्याने जात असलेल्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन आठवड्यांत अशा दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली.
शुभम अविनाश लिंबारे (वय १९, रा. गणेशखिंड रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चेतन पाटील (वय २३, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. चेतन हे मंगळवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास शिवाजीनगर येथील म्हसोबा गेट चौकातील भारतीय स्टेट बँकेसमोरून जात होते. त्या वेळी लिंबारे आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना अडवले. मोबाईल व अडीच हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली. तर २० जुलै रोजी पहाटे तीनच्या सुमारास विनोदकुमार दास (वय २४, रा. विद्यापीठ रस्ता) यांना गणेशखिंड रस्त्यावर लुटण्यात आले. दास हे ई-स्क्वेअर सिनेमागृहासमोरून पायी जात होते. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी त्यांना अडवले. मारहाण व शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ऐवज लांबवला.
(प्रतिनिधी)