नगरसेवकांच्या मानधनात होणार वाढ
By Admin | Updated: July 1, 2015 03:48 IST2015-07-01T03:48:02+5:302015-07-01T03:48:02+5:30
महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणाऱ्या मानधनात आता लवकरच वाढ होणार आहे. नगरसेवकांच्या मानधानात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचा

नगरसेवकांच्या मानधनात होणार वाढ
पुणे : महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणाऱ्या मानधनात आता लवकरच वाढ होणार आहे. नगरसेवकांच्या मानधानात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचा अभिप्राय महापालिका प्रशासनाकडून मागविण्यात आला होता. त्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक अभिप्राय देण्यात आला आहे. मात्र, हे मानधन किती वाढणार, हे अद्याप गुलदस्तातच आहे.
नगरसेवकांना दर महिना साडेसात हजार रुपये इतके मानधन व प्रत्येक सभेला शंभर रुपये याप्रमाणे दर महिन्याला जास्तीत जास्त चार सभांसाठीचा भत्ता मिळतो. त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी काही वर्षांपासून होत आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. गेल्या पंचवार्षिक पालिकेत भाजपाचे नगरसेवक विकास मठकरी यांनी नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावर जोरदार टीका झाल्याने तो मागे घ्यावा लागला होता. मात्र, राज्य शासनानेच आता नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्वच महापालिकांच्या नगरसेवकांचे मानधन वाढविण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी शासनाने महापालिकांकडून अभिप्राय मागविला आहे. पुणे महापालिका प्रशासनानेही शासनाला नुकताच पालिकेचा अभिप्राय पाठविला असून, त्यात शासन निर्णय घेईल तो पालिकेला मंजूर असेल, असे कळविण्यात आले आहे.
त्यामुळे मानवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)