घोडकेच्या कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ
By Admin | Updated: January 12, 2015 23:05 IST2015-01-12T23:05:42+5:302015-01-12T23:05:42+5:30
कुरण येथील जयहिंद पॉलिटेक्निक कॉलेजची फसवणूक व परस्पर ४७ हजार ३०२ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी प्रा. राहुल निवृत्ती घोडके याच्या पोलीस कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ

घोडकेच्या कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ
खोडद : कुरण येथील जयहिंद पॉलिटेक्निक कॉलेजची फसवणूक व परस्पर ४७ हजार ३०२ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी प्रा. राहुल निवृत्ती घोडके याच्या पोलीस कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली, अशी माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे व उपनिरीक्षक राकेश कदम यांनी दिली.
प्राध्यापक राहुल निवृत्ती घोडके यांस जुन्नर पोलिसांनी ७ जानेवारी रोजी अटक केलेली होती. जुन्नर न्यायालयाने त्यास आज दि.१२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर जुन्नर पोलिसांनी राहुल निवृत्ती घोडके यांस जुन्नर न्यायालयासमोर आज हजर केले असता, त्याच्या पोलीस कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली. तपासी अधिकारी राकेश कदम यांनी घोडके तपासात सहकार्य करीत नाही. त्याने वापरलेले बनावट शिक्के अद्याप हस्तगत करण्यात आलेले नाहीत, अशाच प्रकारे आणखी कोठे काही प्रकार केला आहे का? याबाबत माहिती मिळालेली नाही. या गुन्ह्यात कोणी साथीदार आहेत का? याचा तपास बाकी आहे. आदी मुद्दे न्यायालयापुढे सादर करीत घोडके याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी कदम यांनी केली सरकारी वकील अॅड. वसंत वाळेकर यांनी तपास चालू आहे, असे न्यायालयास सांगितले. (वार्ताहर)