संगणकीय टंकलेखन परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ
By Admin | Updated: January 23, 2017 03:04 IST2017-01-23T03:04:17+5:302017-01-23T03:04:17+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणकीय टंकलेखन परीक्षा येत्या २७ ते ३१ जानेवारी आणि ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत

संगणकीय टंकलेखन परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणकीय टंकलेखन परीक्षा येत्या २७ ते ३१ जानेवारी आणि ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे. मागील परीक्षेच्या तुलनेत या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. जानेवारी- फेब्रुवारी २०१७ परीक्षेस ५७ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. मागील परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० हजार होती.
राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, ‘‘एप्रिल २०१६ पासून संगणकीय टंकलेखन परीक्षा घेतली जात आहे. पहिली संगणकीय टकलेखन परीक्षा एप्रिल २०१६ मध्ये, तर दुसरी आॅगस्ट २०१६ मध्ये, तर तिसरी परीक्षा डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात आली. दुसऱ्या परीक्षेस सुमारे ३० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर डिसेंबर महिन्यातील पुरवणी परीक्षेस केवळ ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ३० व ४० शब्द प्रतिमिनिट (श.प्र.मि.) टंकलेखन परीक्षेस एकूण ५७ हजार ५७९ विद्यार्थी बसले आहेत. त्यात ३० श. प्र. मि. परीक्षेस ५५ हजार ८८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर ४० श. प्र. मि. परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ६९२ आहे. त्यामुळे आॅगस्ट २०१६ च्या परीक्षेच्या तुलनेत जानेवारी- फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते.
परीक्षा परिषदेतर्फे २८ डिसेंबर ते ४ जानेवारी २०१७ या कालावधीत संगणकीय टंकलेखन परीक्षेचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले होते.
त्यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा राज्यातील १९५ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यात इंग्रजी ३० व ४० श. प्र. मि. परीक्षा २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे, तर मराठी/ हिंदी ३० व ४० श. प्र. मि. परीक्षा ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे, असेही डेरे यांनी सांगितले.