कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ

By Admin | Updated: October 28, 2015 01:38 IST2015-10-28T01:38:14+5:302015-10-28T01:38:14+5:30

आयटी हब ही पुण्याची मागील काही वर्षांपासूनची ओळख. परंतु तंत्रज्ञानाचे जसे फायदे होतात तसेच तोटेही. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हे त्याचेच एक उदाहरण.

Increase in Computer Vision Syndrome patients | कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ

पुणे : आयटी हब ही पुण्याची मागील काही वर्षांपासूनची ओळख. परंतु तंत्रज्ञानाचे जसे फायदे होतात तसेच तोटेही. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हे त्याचेच एक उदाहरण. पुण्यातील नागरिकांनाही आता याच त्रासाला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मागील काही वर्षांपासून संगणकाचा वापर सर्वच क्षेत्रांत वेगाने वाढत आहे. कित्येक तास सलग संगणकासमोर किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर असणाऱ्या तंत्रज्ञान-सॅव्ही तरुणाईला या आजाराने ग्रासले असून, पुसट दृष्टी, कोरडेपणा आणि प्रतिमांवर दृष्टी केंद्रित करण्यात येणाऱ्या अडचणी अशा तक्रारींमध्ये आता वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
आपल्या मेंदूला प्राप्त होणाऱ्या माहितीपैकी ८० टक्के माहिती ही डोळ्यांमार्फत मिळत असते. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमबद्दल माहिती देताना डॉ. संजय सावरकर म्हणाले, की कॉम्प्युटर स्क्रीनकडे दीर्घकाळ बघितल्यामुळे डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होते, असे अद्याप विज्ञानाने सिद्ध झालेले नाही. स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या तीक्ष्ण प्रकाशामुळे (ग्लेअर) डोळ्यांवर ताण येतो. संगणक किंवा अन्य प्रकारच्या स्क्रीनवर दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तींची डोळ्याची उघडझाप पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे डोळे कोरडे पडतात. प्रत्येक वेळा डोळे बंद करताना डोळ्यावर अश्रूंचा पातळ थर पसरवला जात असतो. संगणकावर नजर स्थिर राहत असल्यामुळे अश्रूंचा थर पसरवण्याची क्रिया पुरेशी होत नाही आणि डोळे कोरडे पडतात.
डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण सामान्य स्थितीत एका मिनिटाला साधारण २२ इतके असते. पुस्तक वाचताना हे प्रमाण मिनिटाला दहा, तर संगणकावर काम करताना मिनिटाला सात वेळा एवढे कमी होते. त्याचबरोबर वातानुकूलन यंत्रणेखाली सतत बसल्यामुळे, कार्यालयातील धुळीमुळेही डोळ्यांवर परिणाम होतो. यामध्ये डोळ्यांची आग होणे, पाणी येणे, डोळे थकणे, डोळे कोरडे पडणे, चोळावेसे वाटणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच संगणकावर काम करताना स्क्रीन आणि डोळ्यांतील अंतर तसेच बसण्याच्या पद्धतीबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. सावरकर यांनी सांगितले.
त्यामुळे डोळ्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच काही सोेपे उपाय केल्यासही या समस्येवर काहीसा आराम मिळू शकतो. यात डोळे ठराविक काळाने गार पाण्याने धुणे, ठराविक काळाने स्क्रीनवरून नजर बाजूला घेऊन इतर ठिकाणी शक्यतो नैसर्गिक गोष्टींकडे पाहणे, हे उपाय करावे. (प्रतिनिधी)

Web Title: Increase in Computer Vision Syndrome patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.