सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदीने जेजुरीत गैरसोय

By Admin | Updated: November 17, 2016 01:39 IST2016-11-17T01:39:45+5:302016-11-17T01:39:45+5:30

सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे.

Inconvenience to the co-operative banks to ban acceptance of notes | सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदीने जेजुरीत गैरसोय

सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदीने जेजुरीत गैरसोय

जेजुरी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी व कामगारांनी या निर्णयाबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कामगार, शेतकरी, हातावर पोट असणारे विक्रेते-व्यवसायिक यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा भरण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र ज्या शेतकऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नाही. त्यांना मर्यादित नोटा भरून (फक्त ४,५००) रक्कम स्वीकारावी लागत होती; त्यासाठी प्रचंड वेळ रांगेत उभे राहावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत ६ ते ७ हजार खातेदार असून गेल्या ८ तारखेपासून आजपर्यंत ३ ते ४ कोटी रुपये ५०० व १,००० नोटांच्या स्वरूपात भरणा झाला आहे. यामध्ये नोटा बदलून दिलेली रक्कमही आहे. मात्र १००, ५०, २०, १० व नव्याने आलेली २,००० रुपयांची उपलब्धता होईल तसे व्यवहार सुरळीत करण्यासाठी शाखा व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. गेल्या दोन दिवसांपासून बँकेमध्ये गर्दी वाढली आहे. मात्र बोटावर शाई लावण्याबाबतचेकोणतेही आदेश वरिष्ठ पातळीवरून आले नसल्याचे शाखाप्रबंधक अमित आनंद यांनी सांगितले.ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य कामगार विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे व्यवहार जिल्हा बँकेमध्ये असतात. त्यामुळे बहुतांश नागरिकांची दोन दिवसांपासून प्रचंड गैरसोय होत आहे. वीजबिले भरणा करताना अथवा सोसायटीकर्ज भरणा करताना अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे जिल्हा बँकेचे शाखाधिकारी प्रतापराव भुजबळ यांनी सांगितले. पतसंस्था व सहकारी बँकेमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी सभासद आहेत. सध्या नोटाटंचाईमुळे व ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याने व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. मात्र पतसंस्थेशी निगडीत असलेल्या नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे काही नाही. सहकारी बँकांना मोठ्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यानेच नागरिकांची असुविधा होत असल्याचे व त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत असल्याचे कडेपठार पतसंस्थेचे माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Inconvenience to the co-operative banks to ban acceptance of notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.