इच्छुकांची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: October 9, 2016 04:33 IST2016-10-09T04:33:39+5:302016-10-09T04:33:39+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षणाबाबतची अनेक दिवसांपासूनची उत्कंठा शुक्रवारी संपली. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असणार हे स्पष्ट झाले असून

इच्छुकांची मोर्चेबांधणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षणाबाबतची अनेक दिवसांपासूनची उत्कंठा शुक्रवारी संपली. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असणार हे स्पष्ट झाले असून, इच्छुकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासह निवडणुकीचे नियोजन सुरू झाले आहे.
आपला प्रभाग कसा असेल, कोणते आरक्षण पडेल, आपल्याला संधी मिळणार की अन्य प्रभाग शोधावा लागणार, याबाबतची इच्छुक व त्यांचे समर्थक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, शुक्रवारी आरक्षण सोडतीनंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. इच्छुकांची आता खऱ्या अर्थाने निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्रभागाची भौगोलिक रचना कशी आहे, मतदारांच्या भेटी घेण्याचे नियोजन कसे करता येईल, अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, प्रचारयंत्रणा कशी राबविता येईल, याबाबतचे नियोजन सुरू आहे. यासह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी काही करता येईल का, याचीही चाचपणी केली जात आहे.
मागील निवडणुकीत दोन वॉर्डचा प्रभाग होता. यंदा मात्र चार वॉर्डचा प्रभाग करण्यात आला आहे. यामुळे प्रभागांचा विस्तार वाढला असून, मिनी विधानसभाच तयार झाली आहे. दरम्यान, यामुळे प्रभागांमध्ये फिरून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना पायपीट करावी लागणार आहे. दूर अंतरावर जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी त्यांना अवधीही अधिक लागणार आहे. दरम्यान, अनेक इच्छुक केवळ आरक्षण सोडतीची वाट पाहत होते. शुक्रवारच्या आरक्षण सोडतीमुळे चित्र स्पष्ट झाल्याने अधिकच जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्या प्रभागात आणखी कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो, आपण निवडून येण्यासाठी काय रणनीती आखता येईल, याबाबतचे नियोजनही केले जात आहे.
प्रभाग मोठा असल्याने इच्छुकांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासह छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासही सुरुवात केली आहे. यासह सोशल मीडियावरून प्रचार यंत्रणा राबविण्याचे नियोजन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग कसा असेल, कुठला भाग आपल्याकडे येईल, याबाबतचा काही इच्छुकांना अगोदरपासूनच अंदाज असल्याने इच्छुकांनी त्यानुसार तयारी सुरू केली होती. त्यानुसार ज्या त्या भागात कार्यकर्त्यांची फळीही उभी केलेली आहे. अशा इच्छुकांना प्रचार यंत्रणा राबविणे काहीसे सोयीचे होणार आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून अगोदरपासूनच तयारी सुरू होती. मात्र, आता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अधिकच वेगात प्रचार यंत्रणेचे काम सुरू केले आहे.