आचिर्णेत आगीत ऊस खाक
By Admin | Updated: December 28, 2014 00:12 IST2014-12-28T00:04:48+5:302014-12-28T00:12:04+5:30
३0 लाखांचे नुकसान : ३० एकरांतील ९०० टन ऊस खाक

आचिर्णेत आगीत ऊस खाक
वैभववाडी : आचिर्णे वडाचा माळ येथे अचानक लागलेल्या आगीमुळे सात शेतकऱ्यांचा ३० एकरातील ऊस जळाला. यात शेतकऱ्यांचा ९०० टन ऊस जळाल्यामुळे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज, शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
आज दुपारी साडेतीनच्या सुमारास आचिर्णे वडाचा माळावरील ऊसशेतीत अचानक आग लागली. यात गावातील सात शेतकऱ्यांनी केलेली ३० एकरांतील ऊस लागवड पूर्णत: जळून खाक झाली.
जवळजवळ एकरी ३० टन उत्पन्न अपेक्षित असणारा सुमारे ९०० टन ऊस तासाभरात जळून खाक झाला. आग लागल्याचे समजताच गावातील ग्रामस्थ ती आटोक्यात आणण्यासाठी धावून आले. मात्र, दुपारची वेळ असल्याने
आगीच्या भडक्यापुढे कोणाचा टिकाव लागू शकला नाही. हातातोंडाशी आलेले पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय जाधव, खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. (प्रतिनिधी)