राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
By Admin | Updated: February 23, 2017 03:28 IST2017-02-23T03:28:10+5:302017-02-23T03:28:10+5:30
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
पुणे : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला बुधवारी नाट्य भारती इंदूर या संस्थेच्या श्रीराम जोगलिखित-दिग्दर्शित ‘काही तरी करा रे’ या नाटकाने सुरुवात झाली. राज्यभरातील २२ केंद्रांवरील प्रथम क्रमांक पटकावलेली २२ नाटके अंतिम फेरीत दोन अंकी नाटके सादर करणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहायक संचालक भारत लांघी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे सल्लागार मिलिंद लेले, स्पधेर्चे परीक्षक श्यामराव जोशी, विश्वास मेहेंदळे, सुधा देशपांडे, सुरेश गायधनी, हेमंत एदलाबादकर आदी या वेळी उपस्थित होते.
राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातूनच रंगमंचावर पाऊल टाकले त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन करायला मिळत आहे, याचा आनंद होत आहे. या स्पर्धेत सलग ३ वर्षे डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनयाचे पारितोषिक मिळविले. याच स्पर्धेमुळे त्यांना ओळख मिळाली असल्याची आठवण डॉ. दीपा लागू यांनी सांगितली.
दि. ४ मार्चपर्यंत ही स्पर्धा भरत नाट्य मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर येथे रंगणार असून मुंबई, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, चंद्रपूर, सोलापूर, पुणे, इंदूर, गोवा व नागपूर अशा २२ केंद्रांवरून आलेल्या २२ नाटकांमधून प्रथम तीन
नाटकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी विश्वास मेहेंदळे, वसुधा देशपांडे, हेमंत एदलाबादकर, मनोहर जोशी आणि सुरेश गायधनी परीक्षक म्हणून काम पाहत आहेत, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक भरत डाके यांनी दिली.
(प्रतिनिधी)