सरकारी कार्यक्रमांवर बंदी केवळ आदेशासाठी?; पुण्यात मंत्र्यांच्या उपस्थितीतच उद्घाटन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 02:19 PM2021-04-08T14:19:14+5:302021-04-08T15:40:59+5:30

पुण्यातील सेन्ट्रल बिल्डिंगमधील पणन कार्यालयाच्या उद्घाटनाची रंगली चांगलीच चर्चा...

Inauguration of the office of the Director of Marketing while government programs are banned | सरकारी कार्यक्रमांवर बंदी केवळ आदेशासाठी?; पुण्यात मंत्र्यांच्या उपस्थितीतच उद्घाटन सोहळा

सरकारी कार्यक्रमांवर बंदी केवळ आदेशासाठी?; पुण्यात मंत्र्यांच्या उपस्थितीतच उद्घाटन सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देसहकारमंत्र्यासह पणन, बाजार समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांची मोठी उपस्थिती

पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्व सरकारी व खाजगी कार्यक्रमांना बंदी घातली असताना आज सेंट्रल बिल्डींगमध्ये तिस-या मजल्यावरील पणन संचालनालयाच्या नुतनीकृत कार्यालयाच्या थेट सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटनचा घाट घातला. 

यासाठी कार्यालयास सदिच्छा भेट अशा स्वरूपाची जाहीर पत्रिका काढून थाटामाटात कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पणन, सहकार आणि पुणे बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने जातीने उपस्थित होते. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सामान्य जनतेवर कडक निर्बंध घातले असताना सरकारी अधिकारी,  मंत्र्यांना नियम पाळणे बंधनकारक नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

राज्यात पुणे, मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये व आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. सध्या एकट्या पुणे जिल्ह्यात दिवसाला १० - १२  हजार रुग्ण नव्याने सापडत आहेत. यामुळेच उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत सर्व शासकीय व खाजगी सार्वजनिक कार्यक्रम शंभर टक्के बंद करण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर अशा कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्यास त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करा असे आदेश दिले. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यातच कडक निर्बंध लागू केले. 

अशा परिस्थितीत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची नुतनीकृत कार्यालयास सदिच्छा भेटीच्या नावाखाली उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील कृषी पणन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी पणन संचालनालयाने केलेल्या विविध उपाययोजना बाबत सदर भेटीवेळी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. पणन संचालक सतिश सोनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची संपूर्ण सेंट्रल बिल्डींगमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
 

Web Title: Inauguration of the office of the Director of Marketing while government programs are banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.