पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सगळे म्हणजे ६ च्या ६ उमेदवार आपलेच असायला हवेत. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी ही जबाबदारी घ्यावी. मनात आणले तर ते काहीही करू शकतात, असे जाहीरपणे म्हणत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार शरद सोनवणे यांनी शिंदेसेनेची राजकीय मनीषा उघड केली. मंत्री उदय सामंत यांच्यासमोर त्यांनी याविषयी भाष्य केले व टाळ्यांच्या कडकडाटात मोठी दाद मिळाली.
डीपी रस्त्यावरील एका लॉनमध्ये शुक्रवारी सकाळी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा मेळावा झाला. विधान परिषदेच्या उपसभापती माजी मंत्री आमदार विजय शिवतारे, आमदार सोनवणे तसेच पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, संपर्कप्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे व पक्षाचे संघटनात्मक अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पक्षात नुकताच प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हेही या मेळाव्याला होते. शहर व ग्रामीण अशा या एकत्रित संवाद मेळाव्यात बोलताना आमदार सोनवणे यांनी पक्षाचे बारामती मिशन उघड केले. सोनवणे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. निकाल जाहीर झाल्यावर लगेचच ते शिंदेसेनेत गेले.
मेळाव्यात ते म्हणाले की, आपली स्वत:ची ताकद भक्कम हवी. राजकारणात काहीही शक्य होते. विजय बापू शिवतारे हे करू शकतात. बारामती लोकसभाही हवी व त्यातील सर्व आमदारही आपलेच हवेत. लोकशाहीत शेवटी डोकी मोजली जातात. आपण ८० उभे केले व ६० निवडून आणले. कोणाकडे किती आमदार आहेत हेच पाहिले जाते. पक्षाने आदेश दिला की कोणी आवडो अथवा न आवडो, दादा, भाऊ असे म्हणत काम करायचे. आता शिवसेनेत जोड्या लावतात. मात्र, आपली शिवसेना तशी नाही, असे सोनवणे म्हणाले.
मंत्री सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला पक्ष क्रमांक एकवर पाहिजे. त्यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागा. शाखा वाढवा, सदस्य वाढवा, शिवदूत नेमून त्यांच्याकडून मतदारसंपर्क करा. यापुढे दर १५ दिवसांनी पुण्यात येऊन संघटनेच्या कामाचा आढावा घेऊ, असेही सामंत यांनी जाहीर केले. डॉ. गोऱ्हे यांनीही पक्षाचे काम वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. मेळाव्यात उपस्थित माजी आमदार धंगेकर यांनी मला संघटनेत काम करायचे आहे, असे सांगितले. सोनवणे यांनी त्याचा उल्लेख केला व त्यांचे कौतुक केले. संघटना महत्त्वाची, तीच उपयोगी पडते, असे ते म्हणाले.