सांडपाणी व्यवस्थापनाची कामे दर्जेदार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST2021-06-16T04:14:14+5:302021-06-16T04:14:14+5:30
भोर : सांडपाणी व्यवस्थापन आणि जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे दर्जेदार व्हावीत. त्याचबरोबर ही कामे लवकरात लवकर पूर्ण ...

सांडपाणी व्यवस्थापनाची कामे दर्जेदार करा
भोर : सांडपाणी व्यवस्थापन आणि जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे दर्जेदार व्हावीत. त्याचबरोबर ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत.
भोर तालुक्यातील सांडपाणी व्यवस्थापन व जलजीवन मिशन अंर्तगत रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या नियोजनाचा आढावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद भोर तालुक्यात आले होते, त्यावेळी वरील सूचना त्यांनी दिल्या. या वेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, भोरच्या सभापती दमयंती जाधव, तालुका आरोग्य अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे, पाणीपुरवठा उपअभियंता ताकवले, बांधकाम उपअभियंता तावरे, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक या वेळी उपस्थित होते. आयुष प्रसाद यांनी रोजगार हमी योजनेतील जनावरांचे गोठे, सांडपाणी योजनेंतर्गत रायरी गावातील रेणुसेवाडी येथील शेषखड्डे व जनावरांचा गोठा, आंबवडे येथील जेधेवाडी रस्ता, आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंगसुळे येथील जलजीवन मिशन अंर्तगत पिण्याच्या पाण्याची टाकी, भांबटमाळ येथील आरोग्य उपकेंद्र, निगुडघर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी केली. तर उपजिल्हा रुग्णालय भोर येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या नियोजनाचा आढावा घेऊन कामाची पाहणी करून माहिती घेतली. भोर तालुक्यात सांडपाणी व्यवस्थापन व जलजीवन मिशन रोजगारी हमी अंतर्गत सुरू असलेली कामे समाधानकारक आहेत. मात्र, ही कामे चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.
फोटो : भोर तालुक्यात कामाची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व इतर.