महत्त्वाची कागदपत्रे झाली खाक!
By Admin | Updated: March 9, 2015 00:43 IST2015-03-09T00:43:52+5:302015-03-09T00:43:52+5:30
शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बारामती नगरपालिकेच्या तळमजल्यावरील नगररचना

महत्त्वाची कागदपत्रे झाली खाक!
बारामती : शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बारामती नगरपालिकेच्या तळमजल्यावरील नगररचना, जागा भाडे, संगणक कक्ष, लेखा विभाग, घरपट्टी, आस्थापना विभागाची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. अंदाजे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाले आहे, असे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.
आग लागल्याचा प्रकार दहा वाजण्याच्या सुमारास शेजारी नवीन प्रशासकीय इमारतीचे काम चाललेल्या कामगारांना लक्षात आला. त्यांनी सुरक्षारक्षकाला याबाबत माहिती दिली. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. बांधकाम व नगररचना विभागाच्या बाजूने आगीचे लोट खिडकीतून बाहेर येत होते.
संगणक कक्षाचे फारसे नुकसान झालेले नाही. त्याचबरोबर जुने ब्रिटिशकालीन रेकॉर्ड, नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असल्यामुळे व्यापार संकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी, एमआयडीसी अग्निशमन विभाग, माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना आदी भागातील अग्निशमन बंबाने जवळपास एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. उर्वरित कागदपत्रे पाण्यामुळे भिजली आहेत.
आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आगीचे कारण काय, याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
आज नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, खातेप्रमुख, मुख्याधिकारी, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत आगीतून बचावलेली कागदपत्रे बाजूला काढण्यात आली. खातेप्रमुखदेखील या कामासाठी जुंपले होते.
नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगरसेवक किरण गुजर, शाम इंगळे, बापू बागल, सुनील सस्ते, शाकीर बागवान, भाजपाचे अॅड. नितीन भामे, रासपचे किशोर मासाळ, मनसेचे विनोद जावळे, माजी नगराध्यक्षा मंगल शहा सराफ यांच्यासह आजी माजी नगरसेवक, मुख्याधिकारी झिंजाड, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, महावितरणचे परिमंडल कार्यकारी अभियंता इरवाडकर, उपअभियंता देवकाते, मोकाशी, पोलीस कर्मचारी, अधिकारी, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, खातेप्रमुख आदींनी आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यामुळे अधिकचे नुकसान टळले. नगरपालिकेच्या आवारातील वाहनांमुळे आग विझविण्यात अडथळे आले. अग्निशमन बंब आत आणण्यात अडचणी आल्या. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जळाली. (प्रतिनिधी)