कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच
By Admin | Updated: August 18, 2014 05:17 IST2014-08-18T05:17:31+5:302014-08-18T05:17:31+5:30
पुरूषप्रधान संस्कृतीत घरचा गाढा ओढणार्या महिलांवर आजही कुटुंब नियोजनाचा भार टाकला जात आहे.

कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच
पुणे : पुरूषप्रधान संस्कृतीत घरचा गाढा ओढणार्या महिलांवर आजही कुटुंब नियोजनाचा भार टाकला जात आहे. सुशिक्षीत समाज आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार यामुळे महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा पुरूषावर नसबंदीची शस्त्रक्रिया करणे सोपे असतानाही त्यासाठी पुरूष पुढे येत नसल्याचे कुटुंब कल्याण विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजही या शस्त्रक्रिया महिलांनाच कराव्या लागत आहेत.
गेल्या ६ वर्षात पुरूष नसबंदीच्या प्रमाणात सातत्याने घट झाली आहे. विशेष म्हणजे, पुरूषांनी नसबंदीसाठी पुढे यावे यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या, जास्त पैसे देऊ केले तरी त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे.
२00८-0९ या काळात राज्य कुटुंब कल्याण विभागाने केलेल्या एकूण कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये ७ टक्के शस्त्रक्रिया या पुरूषांवर करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर या प्रमाणात सातत्याने घट झाल्याचे दिसून येत आहे.
सन २00९-१0 या वर्षात हे प्रमाण घटून ६.४ टक्क्यांवर आले. २0१0-११ या वर्षात हे प्रमाण ५.६ टक्के, २0११-१२ या वर्षात हे प्रमाण ४.१ टक्के, २0१२-१३ या वर्षात हे प्रमाण ३.७ टक्के आणि २0१३-१४ या वर्षात हे प्रमाण आणखी घटून ३.४ टक्क्यांपर्यंत खाली आले. या तुलनेत महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण या ६ वर्षात नेहमी ८0 टक्क्यांहून अधिक राहिले आहे. (प्रतिनिधी)