तत्काळ धावून जाणारे ‘बीट मार्शल’

By Admin | Updated: July 12, 2015 01:40 IST2015-07-12T01:40:00+5:302015-07-12T01:40:00+5:30

कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचणे आवश्यक असते. अशा वेळी काही मिनिटांच्या कालावधीत घटनास्थळावर

Immediately running 'Beat Marshall' | तत्काळ धावून जाणारे ‘बीट मार्शल’

तत्काळ धावून जाणारे ‘बीट मार्शल’

- मंगेश पांडे,  पिंपरी
कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचणे आवश्यक असते. अशा वेळी काही मिनिटांच्या कालावधीत घटनास्थळावर पोहोचणारे गस्तीवरील पोलीस ‘बीट मार्शल’ महत्त्वाची भूमिका बजावतात. शहरातील आठही पोलीस ठाण्यांमध्ये चोवीस तास बीट मार्शल तैनात आहेत. आता तर पुरुष बीट मार्शलसह महिला बीट मार्शलही गस्त घालताना दिसणार आहेत. यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला विनागिअरच्या दुचाकी दिल्या आहेत.
दोन गटांतील वाद, दंगल, अपघातानंतर संतप्त झालेला जमाव, किरकोळ कारणावरून झालेले वाद असे प्रसंग वारंवार घडत असतात. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होेते. अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांची आवश्यकता असते. अथवा गुन्हा घडल्यास पोलिसांची मदत मिळविण्यासाठी प्रत्येकालाच पोलीस ठाणे अथवा चौकी माहीत नसते. पीडित गोंधळलेल्या स्थितीत असतात. अशा वेळी १०० नंबरवरून पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्यास ‘बीट मार्शल’ महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पुरुष बीट मार्शल आहेत. आता महिला बीट मार्शलही मदतीसाठी हजर राहणार आहेत. याचा अधिकाधिक फायदा महिला पीडितांना होऊ शकतो. सध्या परिमंडळ तीनमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात चौकीनिहाय बीट मार्शल नेमले आहेत. चौकीअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात त्यांची गस्त सुरू असते. एका दुचाकीवर दोन कर्मचारी असतात. त्यापैकी एकाकडे शस्त्र आणि वॉकीटॉकी असते. तर, एक जण दुचाकी चालवितो. यामध्ये बँका, शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, एटीएम, धार्मिक स्थळे आदी महत्त्वाच्या ठिकाणी मार्शलचे अधिक लक्ष असते. एखादी व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळल्यास त्याच्याकडील ओळखपत्र तपासणे, राहायला कुठे आहे, कामाला कुठे आहे आदी चौकशी केली जाते. काही गंभीर प्रकार आढळल्यास इतर सहकाऱ्यांच्या मदतीने प्रकरण हाताळले जाते.

शंभर नंबरवर कॉल
एखादी व्यक्ती अडचणीत असली अथवा तातडीने मदत हवी असल्यास मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला १०० नंबरवर कळविण्याची सुविधा उपलब्ध आहे. कॉल केल्यानंतर पीडित व्यक्तीला ठिकाण विचारले जाते. हा संदेश वॉकीटॉकीवर टाकला जातो. काही सेकंदांतच हा संदेश बीट मार्शलपर्यंत पोहोचतो. नियंत्रण कक्षाकडून पीडित व्यक्तीचा संपर्क क्रमांकही वॉकीटॉकीवर दिला जातो. मार्शलला ठिकाण शोधण्यास काही अडचण निर्माण झाल्यास पीडित व्यक्तीशी संपर्क साधून त्या ठिकाणी मार्शल पोहोचतात.

विविध प्रकारचे २५ कॉल
बीट मार्शलकडे असलेल्या वॉकीटॉकीवर संदेश येत असतात. शहरातील विविध भागांतील घटनांची त्यावर माहिती दिली जाते. यामध्ये आपल्या हद्दीतील काही घटना आहे का, याकडे मार्शलचे बारकाईने लक्ष असते. प्रत्येक मार्शलला त्यांच्या हद्दीतील दिवसभरात सुमारे २५ कॉल असतात. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणचा तपशील घेऊन पुन्हा तातडीने नियंत्रण कक्षाला कळविले जाते. तसेच, पीडित व्यक्तीला मदत करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले जाते. त्यानंतर ठाण्यात हजर करून रितसर तक्रार नोंदविली जाते.

महिलांसाठी विनागिअरच्या गाड्या
शहरात आता पुरुष बीट मार्शलसह महिला बीट मार्शलही गस्त घालताना दिसतील. यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून दोन आठवड्यांपूर्वीच प्रत्येक पोलीस ठाण्याला विनागिअरच्या दुचाकी दिल्या आहेत. त्यानुसार परिमंडळ तीनमधील ठाण्यांनाही दुचाकी मिळणार आहेत. यासाठी ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. महिला मार्शलकडे पिस्तूल देण्यात येणार असून, विशेषत: त्याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. महिला बीट मार्शलमुळे महिलांचे प्रश्न तातडीने सोडविण्यास मदत होणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप ठाण्यांना दुचाकी प्राप्त झाल्या नसून, त्या लवकरच मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

८ ते १० मिनिटांत घटनास्थळी
परिमंडळ तीनमध्ये बीट मार्शलचे
मोठे जाळे तयार झाले आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळाल्यास ८ ते १० मिनिटांतच मार्शल त्या ठिकाणी पोहोचतात. दूर अंतर अथवा वाहतूककोंडी असल्यास एखाद्या वेळेला थोडा अधिक वेळ लागतो.

Web Title: Immediately running 'Beat Marshall'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.