शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात
By Admin | Updated: March 28, 2017 23:55 IST2017-03-28T23:55:38+5:302017-03-28T23:55:38+5:30
पुणे जिल्हा परिषदेत ८०३ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या रिक्त

शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात
घोडेगाव : पुणे जिल्हा परिषदेत ८०३ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या रिक्त जागा भरण्यासंदर्भात प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज यांनी केली आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ८ महिने झाले व शैक्षणिक वर्ष संपण्यास ३ महिने शिल्लक असताना जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा न भरल्यामूळे विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षात नुकसान झाले. जिल्हा परिषदेचे रोस्टर निश्चित करण्याचे काम दोन ते तीन वर्षांपासून चालू आहे. यामुळे जिल्हा बदलीने अनेक शिक्षक जिल्ह्यात येण्यास उत्सुक असूनही केवळ रोस्टरचे काम अपूर्ण असल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषदेत सामावून घेता येत नाही.
त्यातच अनेक शिक्षक जिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात जात असल्याने व त्यांच्या रिक्त जागा भरल्या जात नसल्याने यात अजूनच भर पडत आहे. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ३,१७४ प्राथमिक शिक्षक असून त्यामध्ये सुमारे ९,५३७ उपशिक्षक काम करीत आहेत. समानीकरणाच्या बदल्या काही जिल्ह्यांत झाल्या नाहीत; परंतु पुणे जिल्हा परिषदेने समानीकरणाच्या बदल्या केल्याने व आंबेगाव, खेड, जुन्नर या ३ तालुक्यांतील बिगरआदिवासी भागातील जागा रिक्त ठेवल्याने तसेच तालुकाअंतर्गत प्रशासकीय बदल्यांमध्ये या जागा न भरल्याने संपूर्ण वर्षभर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
दुर्गम, डोंगरी व आदिवासी भागात सोयीसुविधांचा अभाव असतो, गोरगरिबांची मुले घरच्या परिस्थितीमुळे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांत मोफत शिक्षण मिळत असल्याने शिक्षण घेतात. खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांच्या प्रवेशाबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या रोखण्यास मदत होणार आहे.याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदलीबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे रोस्टरचे काम अपूर्ण असल्याने आंतरजिल्हा बदलीचा ग्रामविकास विभागाचा आदेश फक्त कागदावरच राहिला आहे. यासाठी रोस्टरचे काम लवकर पूर्ण करून आंतरजिल्हा बदलीतून पुणे जिल्हा परिषदेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना त्वरित समावून घेतले जावे, अशी मागणी दत्तात्रय वाळुंज यांनी केली आहे.(वार्ताहर)
रोस्टर अपूर्ततेचे कारण...
प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे शैक्षणिक अर्हता असून व पात्र असूनही शिक्षकांना सेवाज्येष्ठतेचा लाभ घेता येत नाही. रोस्टरचे कारण दाखवून व रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला केवळ प्रशासनच कारणीभूत ठरले आहे.
मे २०१६मध्ये प्रशासकीय बदली प्रक्रिया राबविल्यानंतर ५७१ उपशिक्षकांच्या जागा रिक्त होत्या.
जून ते आजअखेर जिल्हा बदलीने अनेक शिक्षक स्वजिल्ह्यात बदलीने तसेच अन्य कारणांमुळे गेल्याने उपशिक्षकांच्या रिक्त जागा वाढल्या आहेत.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षात आजअखेर उपशिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात किंवा पदोन्नती प्रक्रिया राबविल्यास प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही रोस्टर अपूर्ततेच्या कारणास्तव होऊ शकली नाही.