इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तत्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:00+5:302021-07-14T04:14:00+5:30
लोकमत इम्पॅक्ट इंदापूर : इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुना पुणे-सोलापूर महामार्गावर पावसाळ्यामुळे अनेक खड्डे पडल्याने अनेक दुचाकी वाहनांचे अपघात होत ...

इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तत्काळ
लोकमत इम्पॅक्ट
इंदापूर : इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुना पुणे-सोलापूर महामार्गावर पावसाळ्यामुळे अनेक खड्डे पडल्याने अनेक दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी (दि. १२) प्रसिद्ध केल्यानंतर इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ दखल घेत संपूर्ण रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे.
इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर, इंदापूर महाविद्यालयासमोर व शासकीय विश्रामगृहाजवळ रस्त्याच्या मधोमध अनेक खड्डे पडले होते. त्यामध्ये पावसाचे पाणी साठून अपघात होत होते. अनेक दुचाकी वाहनचालकांचे छोटे मोठे अपघात झाले होते. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करून घेतला आहे.
इंदापूर शहरात इथून पुढे डांबरी रस्त्यांचे काम दर्जेदार करण्यात येईल. सध्या जुना पुणे-सोलापूर रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर तत्काळ नवीन रस्ता तयार करण्यात येईल. पावसाळा दिवस असल्याने नागरिकांनी वाहने सावकाश चालवावीत, नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय वैद्य यांनी सांगितले.
आम्ही रस्त्यांचे काम उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, जुना पुणे-सोलापूर रस्ता नवीन रस्ता करण्यासाठी शासनाकडून टेंडर झालेले आहे. मात्र सध्या पावसाळ्यात रस्ता तयार केला तर जास्त दिवस काम टिकणार नाही. त्यामुळे आम्ही पावसाळा संपल्यानंतर तत्काळ रस्ता तयार करून घेणार आहोत, असे गॅंगसन इंडिया कंपनीचे सरव्यवस्थापक विपुल नायर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर महामार्गावरील बांधकाम विभागाने डागडुजी केलेला रस्ता.