आजार छोटा, पण भीती मोठी
By Admin | Updated: October 13, 2015 01:05 IST2015-10-13T01:05:17+5:302015-10-13T01:05:17+5:30
आजार छोटा, पण भीती मोठी असे काहीसे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. थंडी, ताप आला की, स्वाइन फ्लू झाला किंवा डेंग्यूची लागण झाली,

आजार छोटा, पण भीती मोठी
नीलेश जंगम, पिंपरी
आजार छोटा, पण भीती मोठी असे काहीसे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. थंडी, ताप आला की, स्वाइन फ्लू झाला किंवा डेंग्यूची लागण झाली, अशा भीतीपोटी अनेक रुग्ण अंथरुणावर खिळून आहेत. काम करण्यास निरुत्साह आल्याने लोकांना घरीच थांबून आराम करावा, असे वाटत आहे. अशक्तपणामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागली आहे. त्याचा परिणाम खासगी आणि शासकीय कार्यालयातही जाणवत आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी आजारपणामुळे रजा घेतल्या आहेत.
वातावरणातील बदलामुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. साथीचे आजारही वाढले आहेत. थंडी, ताप, खोकला, थकवा असे आजार होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. २००९ मध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता. त्या वर्षात स्वाइन फ्लूमुळे मृत्यूची संख्या २१ होती.
स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या २०१०मध्ये होती. यात मृत्यू होणाऱ्यांचा आकडा ५९वर पोहोचला होता. तर, २०११मध्ये फक्त एकच मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ डेंग्यूची लक्षणे आढळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच डेंग्यूमुळे काही बळी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण साधा ताप आला, तरी त्याकडे भयंकर आजाराच्या नजरेतून बघत आहेत.
थंड हवेच्या वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू बळावतात. जानेवारी ते मार्च व जून ते आॅगस्ट या महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. उन्हाळ्यात स्वाइन फ्लूचे विषाणू नष्ट होतात.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, प्रवास करणे टाळावे, हस्तांदोलन टाळावे, लहान मुले आजारी असल्यास शाळेत पाठवू नये, सर्दी, खोकला, ताप असे आजार असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
आजाराची पडताळणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रतिबंधक उपाय करावेत. काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये. स्वाइन फ्लू किंवा डेंग्यू होणारा प्रत्येक माणूस मरतोच, असे नाही. स्वत:ला नक्की कोणता आजार झालाय, त्याची तपासणी करावी. स्वत:ची जबाबदारी ओळखून योग्य त्या उपाययोजना कराव्यात.- डॉ. गीता मुथ्या, मानसतज्ज्ञ