हवेलीत पुन्हा अवैध वाळूउपसा
By Admin | Updated: July 27, 2015 04:02 IST2015-07-27T04:02:44+5:302015-07-27T04:02:44+5:30
वरुणराजाची गैरहजेरी तसेच महसूल व पोलीस यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूक कामांत दंग झाल्याचा मोका साधून हवेली तालुक्यातील वाळूमाफियांनी

हवेलीत पुन्हा अवैध वाळूउपसा
लोणी काळभोर : वरुणराजाची गैरहजेरी तसेच महसूल व पोलीस यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूक कामांत दंग झाल्याचा मोका साधून हवेली तालुक्यातील वाळूमाफियांनी अवैध वाळू उपसा व अनधिकृत वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू ठेवली आहे. इतर गौणखनिज उत्खननही तालुक्याच्या काही भागांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
कारवाईचा धसका काही प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन करणारे व वाहतूक करणाऱ्यांनी घेतला होता. परंतु महसूल व पोलीस विभागाची सर्व यंत्रणा सहा आॅगस्टपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत गुंतली असल्यामुळे खुलेआमपणे अवैध वाळू वाहतूक व गौणखनिज उत्खनन होत आहे.
एकट्या हवेली तालुक्यातून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई करीत सुमारे वीस लाखांहून अधिकचा दंड महसूल विभागाने जमा केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यामध्ये अनेकदा वाळू वाहतूकदारांकडे बोगस चलने आढळल्याने वाळूमाफियांची या व्यवसायातील खोलवर रुजलेली मक्तेदारी स्पष्ट झाली होती.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश २०१५ चे कलम ४८ (७) बाबत व अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत जिल्हाधिकारी खनिकर्म विभागाने एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये पाचपट दंडाची रक्कम आकारण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
अशा प्रकारे पाचपट दंडाची रक्कम आकारण्याचे स्पष्ट निर्देश महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. या आदेशानुसार वाळूमाफियाचे धाबे दणाणले आहे. परंतु या आदेशावर निवडणूक निकाल लागल्यानंतरच अंमलबजावणी होणार असल्याने सध्या तरी वाळूमाफियाचे फावले आहे. त्यामुळे ते राजरोसपणे खुलेआम वाहतूक करताना दिसत आहेत.