जखमा सुगंधी करणारे इलाही, वेदना अनाथ करून गेले...पुण्यातील येरवड्यात अनेक वर्षांपासून वास्तव; तब्येत ठिक नसल्याने गेले होते मूळगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:34+5:302021-02-05T05:15:34+5:30
आता त्यांची लेखणी थांबली असून, गझला पोरक्या अन् अनाथ झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे ते पुण्यात येरवड्यात राहत होते. ...

जखमा सुगंधी करणारे इलाही, वेदना अनाथ करून गेले...पुण्यातील येरवड्यात अनेक वर्षांपासून वास्तव; तब्येत ठिक नसल्याने गेले होते मूळगावी
आता त्यांची लेखणी थांबली असून, गझला पोरक्या अन् अनाथ झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे ते पुण्यात येरवड्यात राहत होते. पण ‘पुण्यात काय माणसं राहतात का ? ? ? ? ?’ असा सवाल ते भेटायला येणाऱ्यांना करायचे ? कारण माणसांचा ओलावा त्यांना कमीच जाणवला. तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपुर्वीच ते आपल्या मूळगावी दूधगाव (ता. मिरज) येथे गेले होते.
इलाही येरवड्यातील एका छोट्याशा खोलीत एकटे राहत होते. त्यांनी त्यांच्या वेदनांना आपल्या लेखणीद्वारे वाट करून दिली होती. गेली ५४-५५ वर्षे ते गझला, दोहे, कविता लिहित होते अन् साहित्याला समृध्द करत होते. त्यांच्या ‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला...’ ही गझल भीमराव पांचाळे यांनी गायली आणि त्यांना सर्वांपर्यंत पोचविले. इलाही स्वत:ही ते मान्य करायचे की, भीमराव यांच्यामुळे त्यांची गझल तळागाळापर्यंत गेली. गेली काही वर्षे इलाही खोलीत एकटे राहत असताना त्यांना सहसा खूप लोकं भेटायला येत नसत. पण त्यांनी त्यांचे आयुष्य साहित्यासाठी वाहिले होते. सकाळी आळंदी रस्त्यावर ते फिरायला जायचे. निसर्ग हाच नवनवीन कविता, गझल लिहिण्यासाठी प्रेरणा देतो, असे ते म्हणायचे. संगम ब्रिज येथे अनेक वर्षांपुर्वी ते सायकलीवर जात असताना, पुलाच्या मध्ये पिंपळ उगवला होता. तेथून त्यांना हवेची थंडगार झुळूक आली आणि त्यावर त्यांनी गझल लिहिली. ‘प्रतिकुल स्थिती असताना जोमात वाढतो आहे, पिंपळापरी या रूजणे, जमेल का ते बघतो आहे’ ही त्यांची गझल अतिशय सुंदर आहे.
शेवटी ते एकटेच राहताना, ते स्वत:ची समाधी लागल्याचे बोलायचे. मला आता समाधी मिळाली आहे आणि त्यामुळे माझं लेखन समृध्द झालं असल्याची भावना ते व्यक्त करायचे. पुण्यात गझलांचा कोहिनूर होता, पण तो इथं अधिक चमकलाच नाही. पण दर्दी रसिकांच्या मनाचे ते कायम ‘कोहिनूर’चे होते आणि राहतील. त्यांच्या जाण्याने गझल अन् वेदना खरोखर अनाथ झाल्याची भावना रसिकांमध्ये आहे.
====================
फेसबुकवर सतत द्यायचे ‘अपडेट’
फेसबुकवर इलाही यांचे खाते होते. त्यावर ते सतत अपडेट देत असत. कालच त्यांनी ‘जखमा अशा सुगंधी...’ या पुस्तकाचे कव्हर पोस्ट केले होते. अनेक तरुण त्यांना भेटत असत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने या तरुणाईने आपल्या भावना फेसबुकवर व्यक्त केल्या.
====================