समीक्षात्मक पातळीवर आत्मचरित्र दुर्लक्षित
By Admin | Updated: March 23, 2017 04:34 IST2017-03-23T04:34:12+5:302017-03-23T04:34:12+5:30
साहित्यात आत्मचरित्र हा साहित्यप्रकार पुष्कळ हाताळला गेला. मात्र समीक्षात्मक पातळीवर या साहित्यप्रकाराकडे दुर्लक्ष झाले

समीक्षात्मक पातळीवर आत्मचरित्र दुर्लक्षित
पुणे : साहित्यात आत्मचरित्र हा साहित्यप्रकार पुष्कळ हाताळला गेला. मात्र समीक्षात्मक पातळीवर या साहित्यप्रकाराकडे दुर्लक्ष झाले, असा सूर गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित ‘आत्मचरित्र : काल, आज आणि उद्या’ या चर्चासत्रात उमटला.
चर्चासत्रात डॉ. कल्याणी दिवेकर, डॉ. ल. का मोहरीर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक कामत, डॉ. वा. पु. गिंडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. या चर्चासत्रात डॉ. अभय दाणी, डॉ. सतीश बडवे यांचे आत्मचरित्रासंदर्भातील निबंधांचे वाचन करण्यात आले.
दिवेकर म्हणाल्या, ‘आत्मचरित्र हा सीमारेषेवरचा वाङ्मयप्रकार आहे. ज्याचा केवळ आस्वाद शक्य आहे; पण समीक्षा शक्य नाही, असा समज करून घेतल्यामुळं कदाचित समीक्षकांच्या बाजूनं या वाङ्मयप्रकाराबाबत आरंभी दुर्लक्ष झाले असावे. मात्र आता ही स्थिती बदलते आहे.’
दीपक करंदीकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेतील पदाधिकारी असलेल्या श्री. म. माटे, म. श्री. दीक्षित, डॉ. न. म. जोशी, डॉ. अशोक कामत, ह. ल. निपुणगे आणि डॉ. वि. भा. देशपांडे व्यक्तींनी लिहिलेली आत्मचरित्रे हा विषय मांडला.
डॉ. सतीश बडवे यांच्या निबंधातून मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील आत्मपर काव्याचे संदर्भ देऊन अलीकडल्या दलितांच्या आत्मकथनांविषयी विस्ताराने परिचय करून दिला.
डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. मुक्ता गरसोळे यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)