महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: January 12, 2015 23:13 IST2015-01-12T23:13:32+5:302015-01-12T23:13:32+5:30
भोर पोलीस ठाण्यात मागील १० वर्षांपासून महिला दक्षता समिती कार्यरत आहे. मात्र, दक्षता समितीच्या सदस्या त्यासाठी वेळ देत नाहीत.

महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
भोर : भोर पोलीस ठाण्यात मागील १० वर्षांपासून महिला दक्षता समिती कार्यरत आहे. मात्र, दक्षता समितीच्या सदस्या त्यासाठी वेळ देत नाहीत. त्यांची महिलांच्या प्रश्नांबाबत काम करण्याची इच्छाही आहे; मात्र भोर पोलीस ठाण्याकडूनच मागील २ वर्षांत एकही बैठक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अन्याय झालेल्या महिलांचे प्रश्न सुटले का? त्यांना न्याय मिळाला का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
महिलांवर होणारे अन्याय दूर व्हावेत, महिलांचे प्रश्न सुटावेत, त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने प्रत्येक पोलीस ठाण्यांर्तगत महिला दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. भोरलाही १० वर्षांपूर्वीच दक्षता समिती स्थापन केली असून, अॅड. जयश्री शिंदे या अध्यक्ष म्हणून मागील ८ ते १० वर्षांपासून क ार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर इतर ७ सदस्या आहेत. महिलांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलावून महिलांचे प्रश्न सोडवावेत, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रत्येक महिला सदस्या त्यांच्या वेळेनुसार काम करतात आणि पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतात.