बनावट डिग्री तपासाकडे पोलिसांकडून होतेय दुर्लक्ष

By Admin | Updated: September 12, 2014 03:20 IST2014-09-12T03:20:42+5:302014-09-12T03:20:42+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रके तयार करणाऱ्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांच्या विरोधात विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे

Ignore fake degrees by the police | बनावट डिग्री तपासाकडे पोलिसांकडून होतेय दुर्लक्ष

बनावट डिग्री तपासाकडे पोलिसांकडून होतेय दुर्लक्ष

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रके तयार करणाऱ्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांच्या विरोधात विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. परंतु, पोलिसांकडून त्यातील एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातच नाही, तर परदेशातही नोकरी मिळविण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर राजरोसपणे करीत आहेत. पोलिसांनी या रॅकेटचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई केली, तर विद्यार्थीसुद्धा गैरमार्गाला जाण्यापूर्वी हजारवेळा विचार करतील. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यापीठाकडून केली जात आहे.
विद्यापीठाशी संलग्न मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयात संकेत नाईकरे या विद्यार्थ्याने प्रथम व द्वितीय वर्षाच्या बनावट गुणपत्रिका सादर केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात संबंधित विद्यार्थ्याने बनावट गुणपत्रिका तयार करून, ती महाविद्यालयात सादर केली होती, अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संकेत नाईकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे
पत्र दिले होते. नाईकरे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या बनावट गुणपत्रिकेबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रकरणातील तपासातून बाहेर येऊ शकली असती. परंतु, सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरीही पोलिसांनी या दृष्टीने कोणताही तपास केला नाही.
सिंगापूर कौंसिलेटकडून पुणे विद्यापीठाकडे काही पदवी प्रमाणपत्रे तपासणीसाठी आली होती. या प्रमाणपत्रांची तपासणी करून, त्यातील ५० प्रमाणपत्रे बनावट असल्याचे विद्यापीठाने शोधले होते. परंतु, सिंगापूरसह इतर १०६ पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके बनावट असून, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा, अशा तक्रारीही विद्यापीठाने पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दिल्या आहेत. परंतु, पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसून येत
नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Ignore fake degrees by the police