अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: July 5, 2014 06:28 IST2014-07-05T06:28:11+5:302014-07-05T06:28:11+5:30

गर्दीच्या चौकातील पदपथांवर हातगाड्या, पथरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष आहे.

Ignore encroachments | अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

पराग कुंकुलोळ, चिंचवड
गर्दीच्या चौकातील पदपथांवर हातगाड्या, पथरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष आहे. खोदलेल्या विद्युत वाहिन्यांचा रोडारोडा काही ठिकाणी पडलेला आहे. तर काही पदपथांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना हक्काच्या पदपथावरून चालनेही अवघड झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

चिंचवड स्टेशन परिसरातील नेहमी वाहतूक कोंडीने गजबजलेले अहिंसा चौकातही परिस्थिती गंभीर आहे. परिसरातील पादचारी मार्गावर विद्युत केबल व अर्धवट कामाचा राडारोडा पडला आहे. या भागात अनेक दिवसांपासून कामे अर्धवट अवस्थेत आहेत. पादचारी मार्गावर लाकडांचे ढीग ठेवण्यात आले आहेत. तर काही भागात वाहने उभी केली जातात. रस्तारुंदीकरण करतेवेळी योग्य नियोनज नसल्याने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर असणाऱ्या नाल्यावर रस्ता अरुंद आहे. पाण्याचे पाइप व अस्ताव्यस्त राडारोड्यामुळे पादचाऱ्यांना वाहनांचा सामना करावा लागतो.
चिंचवड गावातून पिंपरीकडे जाणाऱ्या लिंकरोडवरील परिस्थिती धोकादायक आहे. अरुंद असणाऱ्या रस्त्याच्या कडेला उंचवटा करून पेव्हिंग ब्लॉक तर काही भागात काँक्रिटीकरण झाले आहे. चिंचवड गावात तानाजीनगर, केशवनगर, काकडेपार्क, मोरया गोसावी समाधी मंदिर परिसर हा अंतर्गत रस्त्यांनी जोडलेला परिसर आहे. दाटलोकवस्ती असणारा हा परिसर अरुंद रस्त्यांमुळे त्रासदायक ठरत आहे. काकडेपार्क परिसरात विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचे जाळे पसरले असून व्यावसायिकांनी विक्रीच्या वस्तू दुकानाबाहेर मांडल्या आहेत. अनेक दिवसांपासून नागरिक वाहतुकीचा सामना करत असूनही याबाबत कोणतेही नियोजन होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
आकुर्डीकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दळवीनगर, भोईरनगर भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. येथील चौकात भाजी विक्रेत्यांची व टपऱ्यांची चढाओढ सुरू आहे. पादचारी मार्गाबरोबरच रस्त्यावरही अतिक्रमण करण्याचे धाडस व्यावसायिक करीत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी व अपघात ही नित्याची बाब ठरत आहे. परिसरातील शाळांचे विद्यार्थी वाहनांचा सामना करत ये-जा करतात. वारंवार कारवाई करूनही येथील व्यावसायिक एकमेकांशी चढाओढ करीत रस्त्यापर्यंत भाजींची दुकाने थाटत आहेत. या भागात योग्य नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. भोईरनगरातून चिंचवड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला सुसज्ज पादचारी मार्ग बनविण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे. या भागात नवीन फरशी टाकून पादचारी मार्ग अर्धवट बनविला आहे.
नव्याने बनविलेला हा मार्ग प्रशस्त वाटत असला तरी पादचारी मार्गावर अडथळ्यांची शर्यत आहे. विद्युत रोहित्रे, विजेचे खांब, राडारोडा व मधोमध असलेल्या या मार्गाचा वापर नागरिकांना करता येत नाही. रेल्वेस्टेशन परिसरात एका उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ सीमाभिंत टाकली आहे. याचा राडारोडा पादचारी मार्गावर पडला आहे. या भागात रेल्वे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. रहदारीचा असणारा हा मार्ग धोक्याची घंटा देत आहे.
बिजलीनगर भागातही समस्या गंभीर आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. परंतु, हातगाडीवाले व व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे या भागात वाढती रहदारी पाहता नियोजन होणे महत्त्वाचे आहे.
चिंचवड परिसराचा ज्या झपाट्याने विकास होत आहे, ते पाहता येथील नागरी सुविधा व वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य नियोजन नसल्याचे दिसत आहे. पादचारी मार्ग तयार झाल्याचा दिखावा केला जातो, मात्र यात नियमितपणा व नियोजन नसल्याने चिंचवडमधील सर्वच भागात पादचारी मार्ग धोकादायक झाले आहेत. विविध भागात विकासकामांच्या माध्यमातून पादचारी मार्गाचे काम सुरू असते. काही भागात पेव्हिंग ब्लॉक तर काही भागात फरशी टाकून हा मार्ग बनविला जातो. मात्र, यावरील त्रुटी व अतिक्रमण या समस्या सोडविल्या जात नाही, ही खरी शोकांतिका आहे.
अनेक वर्षांपासून याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. मात्र, वाढत्या अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासन नियोजन करून तोडगा काढत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. तयार करण्यात येणारे पादचारी मार्गाची रुंदी व उंची किती असावी, याची पाहणी न करता मनमानी पद्धतीने हे मार्ग बनविले जातात. यामुळे या कामामध्ये नियोजन नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना व होणारा त्रास विचारात घेऊन पालिका प्रशासन, वाहतूक विभाग व स्थानिक नगरसेवकांनी परिसरातील पादचारी मार्ग पादचाऱ्यांच्या हक्काचे व्हावेत, यासाठी पुढाकार घेणे ही खरी गरज आहे.

Web Title: Ignore encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.