स्मार्ट तरुणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

By Admin | Updated: September 23, 2016 02:33 IST2016-09-23T02:33:36+5:302016-09-23T02:33:36+5:30

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन एका तरुण संगणक अभियंत्याने जगभरातील ७० महापालिकांचा अभ्यास केला

Ignorance of the smart youth | स्मार्ट तरुणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

स्मार्ट तरुणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

पुणे : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन एका तरुण संगणक अभियंत्याने जगभरातील ७० महापालिकांचा अभ्यास केला. त्यातून तब्बल २ हजार नवनवीन संकल्पना त्याने पालिकेला दिल्या. त्याआधारे पुणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेचा देशात दुसरा क्रमांक आला. मात्र, त्यासाठी प्रचंड कष्ट घेणाऱ्या तरुणाकडे मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.
गणेश चव्हाण असे या तरुण संगणक अभियंत्याचे नाव आहे. महापालिकेकडून २५ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर २०१५ दरम्यान महापालिकेकडून ‘स्मार्ट सिटी आयडियाज्’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तीमध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेऊन ३,६०० संकल्पना महापालिकेकडे पाठविल्या. या एकूण आयडियांमधील दोन हजार आयडिया एकट्या गणेश चव्हाण या युवकाने दिल्या होत्या. त्यामध्ये त्याने पहिला क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांकविजेत्याला गिफ्ट कूपन दिले जाईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते.
गणेशने दिलेल्या अनेक आयडियांची प्रत्यक्ष अंमलबजावणीही करण्यात आली आहे. त्याने सुमारे १५ दिवस सलग ७ ते ८ देशांमधील ७० महापालिकांचा अभ्यास करून या आयडिया पालिकेला पाठविल्या होत्या. बक्षीस जाहीर झाल्यानंतर त्यासाठी गणेशने पालिका प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधला. महापालिकेच्या आयुक्तांना अनेकदा ई-मेल पाठवून त्याची आठवण करून दिली. मात्र, त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही.
‘‘महापालिकेकडून खूप मोठ्या बक्षिसाची माझी अपेक्षाच नव्हती. मात्र, मी इतके प्रयत्न करून चांगल्या कल्पना पालिकेला दिल्या, माझा पहिला क्रमांकही आला त्याची किमान दखल पालिकेकडून घेतली जावी, ही अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने तितके औदार्य दाखविले नाही, याचे वाईट वाटते,’’ अशी भावना गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
महापालिकेने नागरिकांच्या सूचना, संकल्पना घेऊन तयार केलेल्या आराखड्याला देशात दुसरा क्रमांक मिळाला. त्यामध्ये महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपली पाठ थोपटून घेतली. मात्र, त्यासाठी झटणाऱ्या तरुणाकडे मात्र सरळ दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Ignorance of the smart youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.